Chandwad News चांदवड : केंद्र सरकारने (Central Government) केलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ नाशिकच्या चांदवड येथील प्रहार शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. 
 
एकीकडे नववर्षाचे सर्वत्र स्वागत होत असतांना दुसरीकडे मात्र शेतकऱ्याचे रोजच मरण होत आहे. हे मरण प्रतिकात्मक स्वरूपात सरकारला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. सरकारला केव्हा जाग येणार? असा सवाल यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे.
 
कांद्याच्या माळा घालत केंद्र सरकारचा निषेध


चांदवड येथील शासकीय विश्रामगृह येथून निघालेली प्रतिकात्मक अंत्ययात्रा प्रांत कार्यालय येथे नेण्यात आली. अंत्ययात्रेत सहभागी शेतकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या साथीने भजन म्हणत व गळ्यात कांद्याच्या माळा घालत हातात केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. प्रांत कार्यालय परिसरात 'सरण' रचत शेतकऱ्याच्या प्रतिकात्मक मृतदेहाला भडाग्नी देण्यात आला. अंत्यविधीचे सर्वच सोपस्कार पार पाडण्यात आले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात संतप्त भूमिका मांडल्या.


...म्हणून काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा
 
यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर म्हणाले की,  एका रात्रीत शेतकऱ्याचे इतके नुकसान होते की त्याला मरण पत्करावे लागते. शेतकऱ्यांचे मरण हे केंद्र सरकारच्या एका चुकीमुळे झाले आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आजची  प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.  


मोदीजी तेव्हाच महाराष्ट्रात या


मोदीजी तुम्ही महाराष्ट्रात नका येऊ, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तुम्ही मरणाच्या वाटेवर सोडले आहे. आम्हाला आता या सरकाची लाज वाटत आहे. आम्ही या देशाचे नागरिक नाही का? आम्हा शेतकऱ्यांना असे का जगावे लागत आहे. देशात सर्वच ठिकाणी महागाई आहे मग आमचा कांदाच का स्वस्त. नाफेडने ३० रुपयांना कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली. मात्र,  8 दिवसातच नाफेड १५ रुपयाला कांदा खरेदी करत आहे. 15 रुपयात देशात काय मिळते? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 


शेतकरी राहायची इच्छा नाही


कांदा हा जीवनावश्यक नाही तरीदेखील तुम्ही का कांदा १५ रुपयाला देण्यास जबरदस्ती करत आहात? तुमच्या एका चुकीमुळे आम्हाला शेतकरी राहायची इच्छा नाही. दिल्लीला समजत नाहीये की आमच्या वेदना काय आहेत. बँक आणि फायनान्सवाले रोज घरी येऊन आम्हाला लाचार करत आहेत. घरावर येऊन नोटीस चिटकवत आहेत. त्यामुळे आम्ही आज निषेध व्यक्त केला आहे. 


१७ दिवसात आमचे सुमारे २ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. देशाला कांदा पुरविणाऱ्या जिल्ह्याला दुर्लक्षित ठेऊ नका. ३० लाख लोक बेरोजगार झाली आहेत. आमचे दोन हजार कोटी द्या आणि त्यानंतरच नाशिकमध्ये पाऊल ठेवा, असेदेखील निंबाळकर यांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Nashik Covid-19 : नाशिक शहरात कोरोनाचा शिरकाव; तीन जणांना लागण, मनपा अलर्ट मोडवर