Lasalgaon News लासलगाव : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लावल्यानंतर कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत आज कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने लिलाव बंद पाडले आहेत. कांद्याला आज सोमवारी सरासरी 1 हजार 67 रुपये भाव तर जास्तीत जास्त 1 हजार 140 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला होता.


महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ हटवावी, कांद्याला हमीभाव द्यावा आदी मागणी करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.


कांद्याला मिळतोय कवडीमोल भाव


यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे म्हणाले की,  7 डिसेंबरला केंद्र सरकारने जी निर्यातबंदी केली. ती निर्यातबंदी केल्यापासून कांद्याचे दररोज दर कमी होत गेले. आज कांद्याला 700, 800 रुपये प्रतिक्विंटल इतका कवडीमोल भाव मिळत आहे.  


केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवावी


कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रति क्विंटल खर्च अडीच ते तीन हजार रुपये होते.  केंद्र सरकारच्या निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांनी आपला कांदा 700, 800 रुपयांना विकणे हे महराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेला मान्य नाही.  केंद्र सरकारने तत्काळ ही निर्यातबंदी उठवावी. याचा निषेध करण्यासाठी आज लासलगाव बाजार समितीचे लिलाव बंद पाडण्यात आले आहे. 


प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी


जोपर्यंत निर्यातबंदी हटणार नाही. तोपर्यंत राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये असेच कांद्याचे लिलाव बंद पाडून केंद्र सरकारचा निषेध केला जाईल. निर्यात बंदी झाल्यापासून शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई म्हणून केंद्र सरकारने महाराष्ट्रातील प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रतिक्विंटल दोन हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भारत दिघोळे यांनी यावेळी केली आहे.


महिन्याभरात हजार कोटीचे नुकसान


शेतकऱ्यांना (Farmers) कांदा निर्यात बंदीचा फटका बसला असून जिल्हाभरात दररोज साधारण दीड लाख क्विंटल कांद्याची आवक होत असते. या तुलनेत भाव फरकाचा विचार केला असता आतापर्यंत महिनाभरात तब्बल 1 हजार कोटीहून अधिक रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान (Loss) झाले आहे. शेतकऱ्यांसोबत बाजार समिती, व्यापारी, निर्यातदार, वाहतूकदार, मजूर, शेड व्यावसायिकांसह इतर कांद्यावर अवलंबून असलेल्या घटकांना फटका बसल्याची माहिती लासलगाव बाजार समितीचे संचालक प्रवीण कदम यांनी दिली आहे. 


आणखी वाचा


Nashik Weather Update : जिल्ह्यातील थंडीचं प्रमाण झालं कमी, काय आहे आजचे तापमान?