Sharad Pawar:  राज्यकर्त्यांच्या मनात फक्त एकच आहे. कधी रामाच्या नावाने, कधी आणखी कुणाच्या नावाने, कधी अयोध्येच्या नावाने राजकारण केलं जातं आहे. जनतेचे मूळ प्रश्न वगळून, धर्म, जात यावर आधारित एक वेगळं सामाजिक चित्र निर्माण करणे आणि कष्टकरी बांधव मूलभूत प्रश्न यापासून बाजूला कसा राहील, याची काळजी घेतली जात आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे.


नाशिक येथे हिंद मजदूर सभा या राष्ट्रीय कामगार संघटनेला 75 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त अमृत महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. ते यावेळी म्हणाले की, आज देशात महागाई, बेरोजगारी, नोकरी यांचा प्रश्न आहे. या प्रश्नांसाठी सत्ता वापरली पाहिजे, याची अपेक्षा राज्यकर्त्यांकडून आहे. मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता वापरावी, मात्र यासाठी राज्यकर्त्यांना वेळ नसल्याचे शरद पवार म्हणाले. 


शरद पवार पुढे म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारचे स्थैर्य देण्याचे काम तुमच्या कष्टामुळे सुरू आहे. हे काम अशाच पद्धतीने चालू राहावे, यासाठी माझी साथ आहे. एक काळ असा होता की, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये कष्टकरी लोकांची संख्या असायची. तसेच एकेकाळी मुंबई शहर देशाची औद्योगिक राजधानी होती. मात्र आज मुंबईचा उल्लेख औद्योगिक राजधानी म्हणून कुणी करत नाही. कदाचित औद्योगिक केंद्र म्हणत असतील. मुंबई शहरात 110-115 टेक्सटाइल मिल होत्या. गिरणगावात सकाळचा भोंगा झाला की आमचा कष्टकरी बांधव कामाला जायचा. दुपारची सुट्टी झाली की पुन्हा घरी जायचा. त्यावेळी कुठेही नजर टाकली की कष्टकरी बांधवांची चाळ दिसायची. मात्र आज ही चाळ, खोली दिसत नाही. आज उंचच उंच इमारती दिसत असून त्या इमारतींमध्ये कष्टकरी राहत नाही. आज जुन्या गिरण्या दिसत नाही. त्या ठिकाणी उंच उंच इमारती दिसतात. त्या ठिकाणचा घाम गाळणारा वर्ग उद्ध्वस्त झाला आहे. हे सगळे केंद्र सरकारच्या आर्थिक नितीचे दुष्परिणाम असल्याची खंत शरद पवार यांनी बोलून दाखवली.


आज अनेक ठिकाणी सरकारी कामे बंद होत आहे. तुम्ही तुमचे काही प्रश्न सोडवून घेण्यासाठी यशस्वी झाले. या संघटनेने सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न सोडवण्यासाठी खबरदारी घेतली. आपली एकी अभेद्य ठेवली पाहिजे. आपली शक्ती मजबूत करायला हवी. कारण आज धर्म आणि जाती यांच्यात फूट पडत आहे. त्याचबरोबर देशात महागाई, बेकारी, नोकरी यांचा प्रश्न आहे. याच्यासाठी सत्ता वापरली पाहिजे, याची अपेक्षा राज्यकर्त्यांकडून  असल्याचे ते म्हणाले. 


...म्हणून हा काळ जागे राहण्याचा आहे!


सत्ता कुणाचीही असली तरी जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविणे हे राज्यकर्त्यांचे काम असते. मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेचा वापर होणं आवश्यक आहे. मात्र आजच्या स्थितीवरून आ दिसतंय की यासाठी त्यांना वेळ नाही. त्यांच्या मनात फक्त एकच आहे. कधी रामाच्या नावाने, कधी आणखी कुणाच्या नावाने, कधी अयोध्या याच्या नावाने मूळ प्रश्न वगळून, धर्म, जात यावर आधारित एक वेगळं सामाजिक चित्र निर्माण करणे आणि कष्टकरी बांधव मूलभूत प्रश्न यापासून बाजूला कसा राहील, याची काळजी घेतली जात आहे. म्हणून हा काळ जागे राहण्याचा आहे. आज तुमच्या डोक्यावर लाल टोपी पहिली, म्हणून बरं वाटलं. सगळे प्रश्न बाजूला टाकून, भलत्या दिशेने समाज नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र तुम्ही देशासाठी काम करता. तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे. तुम्ही एकी ठेवावी, असा सल्ला शरद पवार यांनी दिला.