Nashik Teachers Constituency  Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे वातावरण तापत आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र अर्ज शेवटच्या दिवशी राडा झाला आहे. 


नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Election 2024) 26 जून रोजी मतदान होणार आहे. तर 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे (Sandeep Gulve) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर किशोर दराडे (Kishor Darade) यांनी महायुतीकडून (Mahayuti) शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. 


किशोर दराडेंकडून अपक्ष उमेदवाराला मारहाण, विवेक कोल्हेंचा आरोप  


मात्र या निवडणुकीत किशोर दराडे नावाचे अपक्ष उमेदवार देखील रिंगणात उतरले आहेत. महायुतीचे उमेदवार किशोर दराडे आणि त्यांच्या समर्थकांकडून किशोर दराडे नावाच्या अपक्ष उमेदवाराला मारहाण झाल्याचा आरोप अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी महायुतीचे किशोर दराडे यांनी अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना माघार घेण्यासाठी दबाव टाकल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे. 


किशोर दराडेंचा विवेक कोल्हेंवर पलटवार 


डमी उमेदवार किशोर दराडे यांनी शर्टचे बटन तोडल्याचे मान्य केले आहे. मात्र कोणी धक्काबुक्की आणि मारहाण केली हे माहीत नसल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. पोलीस संरक्षणात किशोर दराडे यांना नाशिकरोड पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.  तर मी कोणावर ही दबाव टाकला नाही, कोल्हे यांच्याच लोकांनी मारहाण केली असल्याचा पलटवार महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांनी केला आहे. या राड्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे. 


दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने


दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महसूल आयुक्त कार्यालयात शिवसेना शिंदे व ठाकरे गट आमनेसामने आले व दोन्ही गटाने एकमेकासमोर घोषणाबाजी केल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता .पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.


इतर महत्वाच्या बातम्या