Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांनी बाजी मारली. शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचा राजाभाऊ वाजे यांनी पराभव केला. त्यामुळे हेमंत गोडसेंची हॅटट्रिक हुकली. मात्र निवडणूक संपताच नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे आणि माजी खासदार हेमंत गोडसे आमनेसामने आले. दोघांनी एकमेकांना 'जादू की झप्पी' देखील दिली. तर दुसरीकडे शिवसेनेचे (Shiv Sena) दोन्ही गट आमनेसामने आल्याने घोषणायुध्द रंगल्याचे दिसून आले.  नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या...


लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) संपताच आता विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Nashik Teachers Constituency Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) संदीप गुळवे (Sandeep Gulve) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महायुतीत (Mahayuti) मात्र शेवटच्या दिवशीदेखील जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. 


राजाभाऊ वाजे-हेमंत गोडसेंची 'जादू की झप्पी'


नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या निमित्ताने दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले. यावेळी नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे आणि माजी खासदार हेमंत गोडसे हे आमनेसामने आले. यावेळी आजी माजी खासदारांनी गळा भेट घेतली. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत वाजे  आणि गोडसे यांची भेट झाली. निवडणूक संपल्याने दोघांची सदिच्छा भेट झाली. दोघांनी गळाभेट घेत एकमेकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. 


शिवसेनेच्या दोन्ही गटात घोषणा युद्ध


एकीकडे राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे यांची गळाभेट झाली तर दुसरीकडे शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने आले. विभागीय आयुक्त कार्यालयातच शिवसेनेच्या दोन्ही गटात घोषणा युद्ध रंगल्याचे दिसून आले. ठाकरे गटाचे संदीप गुळवे उमेदवारी अर्ज दाखल करून कार्यालयातून बाहेर जाताना आणि किशोर दराडे अर्ज भरण्यासाठी आले असताना दोन्ही कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे घोषणाबाजी देण्यात आली.  एकीकडे आजी माजी खासदार गळा भेट घेत असतानाच दुसरीकडे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये सामना रंगला. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या 


Nashik Teachers Constituency Election : नाशिकच्या जागेवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच, तिकीट वाटपाचा सावळा गोंधळ सुरूच


नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत मोठा ट्विस्ट, 'टीडीएफ'मध्ये उभी फूट, निशांत रंधेंकडून उमेदवारी अर्ज दाखल