Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत (Mahayuti) बिघाडी झाल्याचे चित्र आहे. कारण महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे (Kishor Darade) तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे नाशिकचे दोन दिग्गज नेते आमनेसामने येणार आहेत. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या राजकीय डावपेचांचा सामना रंगणार आहे. 


नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जसं जशी जवळ येत आहे तसं तशी चुरस वाढत चालली आहे. उमेदवारांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिंदे गटाकडून किशोर दराडे, ठाकरे गटाकडून संदीप गुळवे (Sandeep Gulve), अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असताना आता महायुतीतील दोन मातब्बर नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगणार आहे.  


राज्य मंत्रिमंडळातील दोन्ही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला


दादा भुसे आणि छगन भुजबळ यांच्यात राजकीय डावपेचांचा सामना नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने रंगणार आहे. या निवडणुकीमुळे राज्य मंत्रिमंडळातील दोन्ही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातच महाविकास आघाडीचा ही उमेदवार रिंगणात असल्याने राजकीय डावपेचात कोण यशस्वी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


महेंद्र भावसारांसाठी राष्ट्रवादीकडून बैठकांचे सत्र


दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ महायुतीकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या बैठकीला मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यात असूनही दांडी मारली होती. तर राष्टवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी पक्षाचा आदेश आला तर पक्षाच्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर सोमवारी राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी महेंद्र भावसार यांच्या प्रचारासाठी पक्षाची बैठक घेतली होती. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघातून कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा


'डमी उमेदवार उभा करणे, आरोप करणे, हा त्यांचा जुनाच छंद'; किशोर दराडेंचा विवेक कोल्हेंवर पलटवार