Nashik Crime News नाशिक : दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मागील भांडणाची कुरापत काढून महिलेसह अन्य दोघांवर भर रस्त्यात हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामुळे दिंडोरीत मोठी खळबळ उडाली असून वणी पोलीस ठाण्यात (Vani Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात वणी पोलीस ठाणेअंतर्गत लखमापूर (lakhmapur) परिसरात टोळक्याने मागील भांडणाचा कुरापत काढून हॉकी स्टिक आणि दगडाने तीन जणांवर भर रस्त्यात हल्ला केला. 14 जूनला ही घटना घडली असून हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
महिलेसह दोन जण जखमी
या हल्ल्यात सतीश भास्कर राजदेव, वैशाली राजदेव आणि जितेंद्र राजदेव गंभीर जखमी झाले आहेत. तसेच एका गाडीची देखील तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र संशयित आरोपींवर कारवाई होत नसल्याचा फिर्यादीने आरोप केला आहे.
गुन्हे रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान
नाशिक जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अल्पवयीन मुलांचाही गुन्हेगारीत सहभाग वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रिक्षा चालकाचा खून करण्यात आला. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.
इतर महत्वाच्या बातम्या