Nashik Teachers Constituency Election 2024 :नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा अंतिम दिवस राजकीय घडामोडींचा ठरला. महायुती (Mahayuti)महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) बंडखोरांना थंड करण्यात अखेर यश आले. भाजपचे डॉ. राजेंद्र विखे पाटील (Rajendra Vikhe Patil), तर काँग्रेसचे दिलीप पाटील (Dilip Patil) यांनी अर्ज माघारी घेत पक्षादेशाचे पालन केले. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे (Kishor Darade), शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे (Sandeep Gulve) व अपक्ष मैदानात उतरलेले कोपरगावचे विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्यात आता तिरंगी लढत होणार आहे. 


लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही तोच, राज्यात शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीने वातावरण तापवले आहे. त्यातही उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते माघारी या कालावधीतील घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे नाशिक शिक्षक मतदारसंघ प्रचंड चर्चेत आहे. 


वरिष्ठ नेत्यांनी चक्रे फिरवली अन् बंड थंड


महायुती व महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजुंच्या इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाला शेवटच्या टप्प्यात सुटली. त्या अगोदर भाजप नेते राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉ.राजेंद्र विखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटली. मविप्रचे संचालक अॅड. संदीप गुळवे यांनी उमेदवारी अर्ज भरलेला असताना काँग्रेसचे पाटील यांनीदेखील अर्ज दाखल केला. त्यामुळे दोन्हीकडे बंडखोरी पाहायला मिळाली. परंतु अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मुंबईत वरिष्ठ नेत्यांनी चक्रे फिरवली आणि बंड थंड झाले.


नाशिक शिक्षक मतदारसंघात तिरंगी लढत


वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर, बुधवारी दुपारी भाजपचे विखे व काँग्रेसचे पाटील यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला. शेवटच्या दिवशी निवडणुकीच्या रिंगणातील 36 पैकी 15 उमेदवारांनी माधार घेतली. आता 21 उमेदवार रिंगणात राहिलेत. पण खरी लढत शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे अॅड. संदीप गुळवे व अपक्ष मैदानात उतरलेले कोपरगाचे नितीन कोल्हे यांच्यात तिरंगी होणार आहे.


नामसाधर्म्य असलेले दराडे, गुळवेंची माघार 


कोपरगाव येथील किशोर प्रभाकर दराडे या अपक्ष उमेदवाराने माघार घेतली. नामसाधर्म्यमुळे फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या समर्थकांनी अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना अर्ज भरण्याच्या दिवशी दबाव केली होती. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. परंतु माघारीच्या दिवशी प्रगट होत त्यांनी अर्ज मागे घेतला. तर ठाकरे गटाचे संदीप गुळवे यांच्याशी नामसाधर्म्य असलेल्या दोन उमेदवारांनीही निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. यामुळे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी डोकेदुखी वाढवल्याची चर्चा होत आहे. 


आणखी वाचा 


Nashik Teachers constituency election 2024: वो मोहरे चल रहे थे, मैं रिश्ते निभा रहा था! नाशिकमधून माघारीनंतर राधाकृष्ण विखेंच्या भावाची फेसबुक पोस्ट व्हायरल