Nashik Chhagan Bhujbal : 'आजवर आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. शून्यातून सर्व निर्माण होत असते. त्यामुळे आम्हाला कुणी शून्याची किंमत समजवू नये. टीका करणाऱ्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करून बोलल्याप्रमाणे आता राजीनामा द्यावा, म्हणजे 2024 ला आमच्यावर जो गुलाल पडणार आहे'. तो 2023 लाच पडेल अशी कोपरखळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आमदार सुहास कांदे यांना मारली.
नाशिक जिल्ह्यातील (Nashik) बाजार समित्यांच्या रणधुमाळीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसून आले. लासलगाव, येवला, मालेगाव, नांदगाव, मनमाड या बाजार समित्यांच्या निकालाने दादा भुसे, सुहास कांदे, छगन भुजबळ यांना कुठे पराभव तर कुठे सत्ता मिळवण्यात यश आले. सुरुवातीला नांदगाव बाजार समिती निवडणुकीत आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी जोरदार तयारी केल्याचे निकालावरून दिसून आले. या ठिकाणी भुजबळ गटाला पराभव सहन करावा लागला. तर दुसरीकडे मनमाड बाजार समितीत (Manmad Bajar Samiti) मात्र उलट चित्र पाहायला मिळाले. या बाजार समिती निवडणुकीत सुहास कांदे गटाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. यावरुन दोन्ही गटांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे सुरु बघायला मिळाले.
सुरुवातीला सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांना आव्हान देत 'छगन भुजबळ माझ्यासाठी शून्य माणूस असून माझ्यासमोर त्यांनी कधीही उभं राहावं' असे ते म्हणाले होते. यावर मनमाड बाजार समितीच्या निकालानंतर छगन भुजबळांनी सुहास कांदे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, 'आजवर आम्ही शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. शून्यातून सर्व निर्माण होत असते त्यामुळे आम्हाला कुणी शून्याची किमत समजवू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आम्हाला सभ्यतेने राजकारण करण्याची शिकवण दिलेली आहे. त्यामुळे आम्ही खालच्या पातळीवर जाऊन कुठलही भाष्य करून राजकारण करणार नाही. त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करून बोलल्याप्रमाणे आता राजीनामा द्यावा म्हणजे 2024 ला आमच्यावर जो गुलाल पडणार आहे. तो 2023 लाच पडेल अशी कोपरखळी कांदे यांना मारली.
ते पुढे म्हणाले की, या निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीच्या परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिले. ते म्हणाले की, नांदगाव विधानसभा मतदार संघातील नागरिक हे सध्याच्या लोकप्रतिनिधीच्या गुंडगिरी आणि दबावाला कंटाळून विकासाच्या बाजूने कौल देत परिवर्तन केलं आहे. मनमाड आणि नांदगांव मतदारसंघांतील मालेगाव मध्ये परिवर्तनाच्या बाजूने कौल दिला आहे तर नांदगाव बाजार समितीत जरी पराभव झाला असला तरी चांगली लढत आपण दिली. अतिशय कमी फरकाने आपले उमेदवार यात पराभूत झाले असले तरी मतदारांनी दिलेला हा कौल परिवर्तनाचा कौल आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
महाविकास आघाडी पॅनलला चौदा जागा
आमदार कांदे विरुद्ध पाच माजी आमदार यांनी निवडणूक लढवल्याने या निवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळाली होती. मात्र महाविकास आघाडीच्या सूक्ष्म नियोजनाने सुहास कांदे गटाला या निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागला. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी प्रणित परिवर्तन पॅनलला अपक्षांसह 14 जागा, शिंदे गट 3 तर हमाल मापारी गट अपक्ष 1 जागा मिळाली आहे. व्यापारी गटातील 2 अपक्ष उमेदवार यांनी देखील परिवर्तन पॅनलला पाठिंबा जाहीर केला असल्याने भुजबळांच्या नेतृत्वाखालील निवडून आलेल्या उमेदवारांची एकूण संख्या 14 झाली आहे.