Nashik News नाशिक : केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे विविध पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात नाशिक शहर पोलीस (Nashik Police) आयुक्तालयातील चार तर ग्रामीण पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक (President Medal) जाहीर करून सर्वोच्च सन्मान देण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील 18 पोलिसांना शौर्य पोलीस पदक जाहीर झाले आहे. चार पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. ४० पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना गुणवंत पोलीस पदक जाहीर झाले आहे.


यात नाशिक पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक उत्तम सोनवणे, बीडीडीएसचे सहायक उपनिरीक्षक नंदू उगले, सहायक उपनिरीक्षक अशोक काकड आणि वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार नितीन संधान यांचा समावेश आहे. तर ग्रामीण पोलीस दलातील प्रमोद आहेर आणि विनय देवरे यांचा समावेश आहे.  


पोलीस उपनिरीक्षक उत्तम सोनवणे


नाशिक शहर पोलीस दलात 1988 साली उत्तम सोनवणे भरती झाले. त्यांनी 35 वर्षांच्या पोलीस सेवेत 200 रिवॉर्डस्‌ व 7 प्रशस्तीपत्र मिळविले आहेत.ते मूळचे मनेगाव (ता. सिन्नर) येथील रहिवासी आहेत. अंबड, भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, इंदिरानगर, गुन्हेशाखा, सीआयडी याठिकाणी त्यांनी कर्तव्य बजावले आहेत. 2021 साली त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली. सोनवणे सध्या अंबड पोलीस ठाण्यात सेवेत आहेत. गेल्या वर्षी कारागृहात संचित रजेवर आलेल्या आरोपीने पवननगर येथे ब्युटिपार्लरमध्ये शिरून महिलेवर अत्याचार केला होता. त्यास उपनिरीक्षक सोनवणे यांनी अटक केली होती.


सहायक उपनिरीक्षक नंदू उगले


शहर पोलीस दलात 1990 साली नंदू उगले भरती झाले. त्यांनी आपल्या 33 वर्षांच्या सेवाकाळात 189 रिवॉर्डस्‌, 6 प्रशस्तीपत्रे मिळविली आहेत. 2019 साली पोलीस महासंचालक पदकानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. उगले यांनी नाशिकरोड, पंचवटी, भद्रकाली, अंबड, शहर वाहतूक शाखा, आर्थिक गुन्हेशाखा येथे कर्तव्य बजावले असून, सध्या बॉम्ब शोधक पथकात कार्यरत आहेत. पोलीस दलास असतानाच आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणूनही उगले यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे. राष्ट्रीयस्तरासह ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, अमेरिका येथे पार पडलेल्या विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये उगले यांनी पदकांची कमाई केली आहे.


सहायक उपनिरीक्षक अशोक काकड


शहर पोलीस दलात 1989 साली अशोक काकड हे दाखल झाले. काकड  यांनी 36 वर्षांच्या सेवाकाळात 281 रिवॉर्डस, 9 प्रशस्तीपत्रे मिळविली आहेत. तसेच, नाशिकरोड, भद्रकाली, इंदिरानगर, शहर वाहतूक शाखा, पोलीस मुख्यालयात सेवा केली असून सध्या पंचवटी पोलीस ठाण्यात सहायक उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावत आहेत. गुन्हेशोध पथकांमध्ये काम करीत असताना अनेक गुन्ह्यांची काकड यांनी उकल केली आहे.


हवालदार नितीन संधान


शहर पोलीस दलात नितीन संधान हे 1991 साली दाखल झाले. ते  मूळचे विंचूर (ता. निफाड) येथील रहिवासी आहेत. गुन्हेशाखेसह अंबड, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जात पडताळणी विभागात कर्तव्य बजाविलेले संधान सध्या शहर वाहतूक विभाग दोनमध्ये सेवा बजावत आहेत. 33 वर्षांच्या सेवाकाळात संधान यांनी 220 रिवॉर्डस्‌, 5 प्रशस्तीपत्र मिळवले आहेत. पोलीस महासंचालकांच्या पदकाने त्यांना 2022 साली सन्मानित करण्यात आले आहे. अंबड पोलीस ठाण्यात असताना संधान यांनी टिप्पर टोळीचा सराईत गुन्हेगार गण्या कावळ्यास अटक केली होती. 


सहाय्यक उपनिरीक्षक प्रमोद आहेर


प्रमोद आहेर हे 1989 साली नाशिक पोलीस दलामध्ये शिपाई या पदावर भरती झाले होते. आहेर यांना 242 रिवॉर्डस्‌ मिळाले आहेत. 2017 साली पोलीस महासंचालक पदकानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ते मूळचे देवळा येथील रहिवासी आहेत. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हेशाखा, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सटाणा, वाडिवर्हे, येवला, ॲण्टी ह्युमन सेलमध्ये त्यांनी सेवा बजावली आहे. सध्या ते सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर ओझर येथील विमानतळ सुरक्षा विभागात कार्यरत आहेत.


सहाय्यक उपनिरीक्षक विनय देवरे 


विनय देवरे हे 1988 मध्ये पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झाले होते. मूळचे वीरगाव (ता. सटाणा) येथील असलेले देवरे यांनी अंबड, मालेगाव, कळवण, नांदगाव, जायखेडा येथे सेवा बजावली आहे. सध्या ते सहायक उपनिरीक्षक म्हणून देवळा येथे कार्यरत आहेत. त्यांना 156 रिवॉर्डस्‌ मिळाले आहेत. 2018 साली त्यांना पोलीस महासंचालक पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे.


आणखी वाचा