नाशिक: नाशिक तालुक्यातील लहवित भूमिपुत्र व तोफखाना केंद्राच्या 285 मिडीयम रेजिमेंटचे लान्सनाईक संतोष विश्वनाथ गायकवाड यांना आसामच्या लंका नावाच्या लोकेशनवर कर्तव्य बजावताना वीरमरण आले. त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात आज सकाळी नऊ वाजता गायकवाड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. 


नाशिक तालुक्यातील लहवित येथे राहणारे सध्या सिक्कीमच्या उत्तरेला आसाम राज्यातील होजाई जिल्ह्यातील लंका शहराजवळ बर्फाळ प्रदेशात संतोष गायकवाड हे कर्तव्यावर तैनात होते. रक्त गोठवणाऱ्या थंडीमुळे त्यांना अचानकपणे मेंदूमध्ये त्रास उद्भवला.  रेजिमेंटकडून तात्काळ त्यांना कोलकात्याच्या रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. उणे 15 ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान या भागात असते, तेथे गायकवाड हे कर्तव्य बजावत होते. ते आर्टिलर च्या 285 मिडीयम रेजिमेंटच्या लान्स नायक पदावर होते. त्यांचे पार्थिव नाशिकरोडच्या तोफखाना केंद्रात मंगळवारी रात्री बारापर्यंत दाखल झाले. 


लहवितच्या शेतकरी कुटुंबात गायकवाड हे भारतीय सैन्य दलात तोफखान्याच्या माध्यमातून दाखल झाले होते. दिवाळीत त्यांना वीरमरण आल्याने गायकवाड कुटुंबीय अशोक मग्न झाले आहे. लक्ष्मीपूजन व भाऊबीजेचा उत्साह असताना ही दु: खद घटना घडल्याने सणाचा आनंद शोकात बदलला आहे. पंचक्रोशीत गायकवाड यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.


संतोष गायकवाड हे 1996 साली नाशिकरोड तोफखाना केंद्रातून गनर म्हणून सैन्यदलात भरती झाले होते. त्यानंतर प्रचंड मेहनतीवर ते लान्सनायक पदापर्यंत पोहोचले होते. पुढच्या वर्षी सप्टेंबर महिन्यातील लहवितला आले होते. महिनाभराच्या सुट्टीत आल्यानंतर त्यांनी आपले कुटुंबीय नातेवाईक, मित्रपरिवांची भेट घेतली होती, ही भेट सर्वांसाठी अखेरची ठरली.


दरम्यान गायकवाड यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी ही नाशिकरोडच्या तोफखाना केंद्राच्या 621 साठा बॅटरीकडे सोपवण्यात आले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच लहवितसह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. गायकवाड यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे. 


दोन दिवसांपूर्वी उपचार 


मेंदूची रक्तवाहिनी ब्लॉक झाल्यानंतर गायकवाड यांना तातडीने कोलकत्याच्या सैन्यांच्या कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र दुर्दैवाने मंगळवारी पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतल्याची माजी सैनिक व त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.