Nashik News : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला बहुचर्चित अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवेला (Anjaneri-Brahmagiri Ropeway) किक मिळाली असून पुढील महिनाभरात या कामाची निविदा निघणार आहे. त्याचबरोबर येत्या तीन महिन्यात प्रत्यक्षात काम सुरु होईल, असा विश्वास खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे जवळपास पाच किलोमीटरची हवाई सफर भाविकांसह पर्यटकांना करता येणार आहे. 


नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. वर्षभर हजारो लाखो भाविकांचा राबता या त्र्यंबक नगरीत असतो. त्याचबरोबर जवळच असलेल्या अंजनेरी येथेही भाविकांची गर्दी असते. हे दोन्ही पर्यटनस्थळ भाविकांना हवाई सफरीचा माध्यमातून पाहता यावेत यासाठी अंजनेरी ते ब्रह्मगिरी असा रोपवे तयार करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकल्प प्रस्तावित होता. मात्र स्थानिक गावकरी आणि पर्यावरणप्रेमींचा देखील विरोध होता. तत्कालीन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत हा प्रकल्प स्थगित करण्याचे आदेश दिले होते. मात्र नव्याने या प्रकल्पाला संजीवनी मिळाल्याचे चित्र आहे.


त्र्यंबकेश्वर शहराजवळील अंजनेरी ते ब्रह्मगिरी यांना दोन पर्वतांना जोडणाऱ्या रोपवेला मंजुरी मिळाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या प्रकल्पामुळे या दोन्हीही तीर्थक्षेत्रावरील पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा सरकारचा तसेच खा. हेमंत गोडसे यांचा विश्वास आहे. नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड (NHLML) ही केंद्र सरकारची कंपनी हे काम 2 वर्षात करणार असून 2027 च्या कुंभमेळ्यापूर्वी हे काम होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. 
 
त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी ते अंजनेरी (5.8 किलोमीटर) अंतर रोपवेने जोडले जाणार आहे. केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेत हे पर्वत एकप्रकारे हवाई वाहतुकीने जोडले जाणार आहे. कठीण डोंगराळ भागात पारंपारिक रस्त्यांच्या जागी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ अशा स्वरुपाचे रोपवे उभारण्याचे मानस अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात करत पर्वतमाला योजना घोषणा केली होती. एनएचएलएमएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ प्रकाश गौर यांच्यासह प्रतिनिधी यापूर्वी त्र्यंबकेश्वरला भेट देत पाहणी केली आहे. तर नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड कंपनीच्या प्रतिनिधींना सहकार्य आणि योग्य ती मदत करण्याचे आदेश त्र्यंबकेश्वर प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांनी त्र्यंबक तहसीलदारांना दिले आहेत.


असा असेल रोपवे!


ब्रह्मगिरी पर्वत ते अंजनेरी टेकडी दरम्यान या रोपवे प्रकल्पाचे अंतिम संरेखन राज्य सरकारशी सल्लामसलत करुन निश्चित झाले आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी अत्याधुनिक मोनोकेबल डिटेचेबल गोंडोला तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. दोन टेकडीच्या मध्ये मध्यवर्ती स्टेशन असेल. प्रकल्पासाठी 30 हून अधिक टॉवर बांधले जातील. रोपवेची वाहून नेण्याची क्षमता प्रति तास किमान 1500 प्रवासी शक्यता आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये रोपवे स्टेशन उभारले जाऊ शकते.


भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त


ब्रह्मगिरी पर्वत आणि अंजनेरी या दोन्ही डोंगरांना धार्मिक महत्त्व आहे. ब्रह्मगिरी पर्वत हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. तिच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर येथे आहे. तसेच अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. दरवर्षी देशाच्या विविध भागातून लाखो भाविक या दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी येतात. रोपवेमुळे दोन्ही डोंगरमाथ्यावर पर्यटकांना सहज प्रवेश मिळू शकणार आहे.


निसर्गप्रेमींची नाराजी कायम


दरम्यान या प्रकल्प बाबत निसर्गप्रेमींनी निसर्ग पर्यावरण धोक्यात येईल, असे सांगत यापूर्वीच विरोध केलेला आहे. त्यामुळे आता सद्यस्थितीत होऊ घातलेला हा प्रकल्प स्थानिक पर्यटन वाढीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. मात्र आता निविदा निघाल्यानंतर पर्यावरण प्रेमी नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. नुकताच ब्रह्मगिरी येथील डोंगरावर दगड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे आगामी काळात जर रोपवे झाला तर या सर्व बाबी प्रशासनाने तपासून घेणे महत्वाचे असणार आहे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.