Nashik News नाशिक : जेव्हा जेव्हा भाजपा सत्तेत येते तेव्हा तेव्हा जातीय तेढ निर्माण होतो, असा गंभीर आरोप सुजात आंबेडकर यांनी केला. कंत्राटी भरतीच्या विरोधात नाशिक शहरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सुजात आंबेडकर यांनी या मोर्चात सहभागी होत कंत्राटी भरतीचा निषेध नोंदवला. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कंत्राटी नोकर भरती विरोधात एल्गार मोर्चा काढण्यात आला होता. सर्व प्रकारची कंत्राटी भरती रद्द करावी, सरकारी क्षेत्रात खासगीकारण बंद करावे, अशा स्वरूपाची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 


राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी रद्द केलेल्या कंत्राटी नोकर भरतीच्या ठेकेदारांना पुन्हा एकदा 9 महिन्याची मुदतवाढ दिली. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना सुजात आंबेडकर यांनी राज्य सरकार तसेच भाजपावर सडकून टीका केली. 'जेव्हा जेव्हा भाजपा सत्तेत येते, तेव्हा तेव्हा जाती-जातीत तेढ निर्माण होते' असा गंभीर आरोप सुजात आंबेडकर यांनी केला. ते पुढे म्हणाले, आत्ताच्या सरकारमध्ये इकडचे-तिकडचे लोक सामील झालेले आहेत. त्यांनी आधी एकत्र बसून आपसातील मतभेद दूर केले पाहिजेत. 


सरकार भाड्याने चालवायला दिलंय  -


कंत्राटी नोकर भरती बाबत बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, कंत्राटी भरती म्हणजे तुम्ही सरळ सरळ सरकार भाड्याने चालवायला देता आहात. येत्या काळात स्पर्धा परीक्षा पुन्हा आणाव्यात. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी राजस्थान राज्याच्या धर्तीवर वन टाइम रजिस्ट्रेशन सिस्टिम असावी. जेणेकरून विद्यार्थ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक होणार नाही. यासोबत मागील काही वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्या जात आहेत. याबाबत देखील सुजात यांनी सरकारवर जोरदार टीका करताना तुम्ही थेट गरिबांचा आणि वंचितांचा  शिक्षणाचा हक्काच काढून घेत आहात असे मत व्यक्त केले. 


12 कुटुंबांच्या ताब्यात सत्ता, बाकी समाज वंचितच 


 सुजात आंबेडकर यांनी यावेळी मराठा आरक्षण प्रश्नावरही आपले परखड मत व्यक्त केले. ते म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात तर मराठा समाजातील केवळ 12 कुटुंबांच्या ताब्यात कायम सत्ता राहिली. बाकी समाज तर वंचितच राहिलाय. वंचित बहुजन आघाडीचा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा फॉर्म्युला बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे आहे. जर सत्तेत बसलो तर नक्कीच तो फॉर्म्युला आम्ही अमलात आणू.