Nashik News : नाशिकच्या (Nashik) बागलाण तालुक्यातील (Satana) ठेंगोडा शिवारात शेतात शेळया-मेंढ्या चारण्याचे काम करणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांची महीला आणि बालविकास विभाग आणि पोलिसांच्या मदतीने वेठबिगारीच्या विळख्यातून मुक्तता केली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा वेठबिगारीचा मुद्दा अद्यापही नाशिक जिल्ह्यात गंभीर असल्याचे दिसून आले आहे. 


काही दिवसांपूर्वी इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील उभाडे गावात आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबाला पैसे आणि मेंढीपालनाचे आमिष दाखवून त्यांच्या मुलांची विक्री झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती. गौरी नावाच्या 11 वर्षीय मुलीचा वेठबिगारीतून (Disorder) मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. मात्र त्यानंतर देखील वेठबिगारीचा मुद्दा अद्यापही नाशिक (Nashik District) जिल्ह्यात गंभीर असल्याचे एका घटनेतून दिसून आले आहे. नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आदीवासी समाजात असणाऱ्या गरीबी आणि दारिद्रयाचा फायदा घेवून समाजातील अल्पवयीन मुलांना वेगवेगळ्या उद्योग व्यवसायात गुंतविण्याचे प्रकार सध्या उघडकीस येत आहेत. 


दरम्यान, सर्वसाधारण कुटूंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यास मुले शाळेत जात नाहीत. गरिबीमुळे शाळा न शिकता मुले कामधंदा करून अर्थार्जन करतात. समाजातील ही अनिष्ट प्रथा संपुष्टात आणण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. सदर समस्येची सोडवणूक करण्यासाठी नाशिक जिल्हयाचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे विशेष पथक गठीत केलेले आहे. सदर पथक हे नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील आदीवासी भागात तसेच अतिदुर्गम भागांतील वाड्या-वस्त्या आणि गावांना भेटी देवून तेथील स्थानिक पोलीस पाटील, आदीवासी समाजातील प्रतिष्ठीत नागरीक, ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य यांची मदत घेवून त्या ठिकाणी नागरीकांना विश्वासात घेवून बालकामगार आणि वेठबिगारी निर्मूलनाविषयी प्रबोधन करत आहेत. त्याचप्रमाणे, वेठबिगार संदर्भातील काही अप्रीय घटना घडणार नाही, याबाबत जनजागृती करीत आहेत.


बागलाण  तालुक्यातील ठेंगोडा शिवारात कृषी उत्पन्न बाजार समीतीचे गेटजवळ एका शेतात शेळया-मेंढ्या चारण्याचे काम करणाऱ्या दोन अल्पवयीन बालकांची मुक्तता केली आहे. संभाजी शिवाजी पाकळे, नंदलाल बाबुराव पाकळे यांनी या दोन्ही मुलांना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शेळ्या मेंढ्यांच्या वाड्यावर शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी सालाने ठेवून घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात दोन  गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर पथक हे बालकामगार आणि वेठबिगार निर्मुलन आणि जनजागृती मोहीम अधिक व्यापक करून ती अव्याहतपणे सुरू राहील असे नाशिक ग्रामीण पोलीसांनी स्पष्ट केले आहे.