Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील काही दूध संकलन केंद्रांवर पावडर, रसायन टाकून दूधात भेसळ करण्याचे प्रकार सुरूच आहेत. मनमाड शहरातील दूध संकलन केंद्रावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने छापा टाकून दूध भेसळ (Adulterated Milk) होत असल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. बनावट दूध तयार करण्यासाठी वापरली जाणारी पावडर, घातक रसायन जप्त केले. तर संशयावरून 12 हजार लिटर दूधही नष्ट करण्यात आले आहे. नाशिक अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई करण्यात आली आहे.


नाशिक शहरात (Nashik City) अन्न आणि औषध प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी अन्न पदार्थात भेसळ करण्यात येत आहे, अशा ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्यात येत आहे. अशातच मनमाड (Manmad) शहरातील दूध संकलन केंद्रावर पावडर, रसायन वापरून दूध तयार केले जात असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त यांना मिळाली होती. त्यानुसार अन्न आणि औषध प्रशासन विभागाने छापे टाकत संशयावरून 12 हजार लिटर दूध नष्ट केले. भेसळीच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली असून येथे घेतलेले नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्रलंबित असून तो प्राप्त होताच कायद्यानुसार कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती विभागाचे सहायक आयुक्त विवेक पाटील यांनी बुधवारी दिली.


दरम्यान, नाशिक विभागात (Nashik Division) काही दिवसांपासून दुधातील भेसळीचे प्रकार मोठ्या प्रमाणात आढळल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दूध तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ग्राहकांना सुरक्षित दूध मिळावे यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून नियमितपणे दूध संकलन केंद्र, दूध प्रक्रिया केंद्र, वितरक, किरकोळ विक्रेत्यांच्या दुधाचे नमुने घेतले जातात. दुधाच्या भेसळीचे गांभीर्य लक्षात घेऊन दूध केंद्र आणि प्रक्रिया केंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून अन्न आणि औषध प्रशासनास मिळालेल्या माहितीच्या आधारे मनमाड शहरात उ. सि. लोहकरे, अन्न आणि औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त विवेक पाटील, संदीप देवरे, अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाकडून 28 एप्रिलला आईसाहेब स्वयंसहायता बचतगट दूध संकलन आणि शीतकरण केंद्रावर छापे टाकण्यात आले. 


बारा हजार लिटरचा साठा नष्ट 


या दूध संकलन केंद्रावर दूध संकलन आणि शीतकरणाचे कामकाज सुरू असल्याचे आढळले. या ठिकाणी तीन वेगवेगळ्या टँक बीएमसी असून त्यामध्ये एकत्रित 12 हजार लिटर दूध संकलित करून शीतकरणासाठी साठवलेले आढळले. लगतच्या गाळयात तपासणीअंती एका विनालेबलच्या खुल्या प्लॅस्टिक बॅगमध्ये 10 किलो व्हे पावडर आढळली. त्या ठिकाणी दुधाच्या साठ्यात या पावडरची भेसळ होत असल्याच्या संशयावरून अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांनी तीनही बीएमसी टँकमधून तीन मिक्स मिल्क तसेच व्हे पावडरचा साठा या दुधाचे नमुने विश्लेषणासाठी घेऊन व्हे पावडरचा साठा भेसळकारी पदार्थ म्हणून नमुना घेत त्याचा उर्वरित आठ किलो साठा जप्त केला. मिक्स मिल्कचा चार लाख 56 हजार रुपयांचा 12 हजार लिटर साठा नाशवंत असल्याने तसेच भेळ पावडरची भेसळ केल्याचा दाट संशय असल्याने पंचा समक्ष तो नष्ट करण्यात आला यावेळी सह आयुक्त नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.