Nashik News : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणानंतर हिंदू हुंकार सभेत नाशिकमधील एका दर्ग्याच्या जागेवरून वाद निर्माण झाला. आता या दर्ग्याला नाशिक महापालिका प्रशासनाने नोटीस पाठवली असून सात दिवसात खुलासा न केल्यास पालिका (Nashik NMC) बुलडोझर चालवणार असल्याचा इशारा या नोटिसीद्वारे संबंधित दर्गा प्रशासनास देण्यात आला आहे. 


गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवतीर्थावर सभा झाली. यावेळी राज ठाकरे सभेत माहिम आणि सांगलीमधील कुपवाड भागातील मंगलमूर्ती कॉलनीमधील अनधिकृत मशीद (Mosque) बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर राज्यभरातील अनाधिकृत बांधकामाचा मुद्दा हा सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरतो आहे. मुंबई, सांगली पाठोपाठ नाशिकमधील (Nashik News) दर्ग्याच्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे.  गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू हुंकार सभेत शहरातील अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडण्याची मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानंतर आज  महापालिका प्रशासनाने संबंधित ट्रस्टला नोटीस बजावली आहे. 


नाशिकच्या ईदगाह मैदानावर बुधवारी सायंकाळी हिंदू हुंकार सभेचे (Hindu Hunkar Sabha) आयोजन करण्यात आले होते. या सभेला अनेक साधू महंतांनी हजेरी लावली होती. यात गंगापूर रोडवरील (Gangapur Road) प्रसिद्ध नवश्या गणपतीला (Navshya Ganpati) लागूनच असलेल्या दर्ग्याचे अनाधिकृत बांधकाम हटवण्याबाबत सरकारला यावेळी इशारा देण्यात आला होता. नवशा गणपती मंदिरा शेजारी असलेला दर्ग्याचे अतिक्रमण असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांनी आरोप केला होता. त्यानंतर आता नाशिक महापालिकेने दर्गेला नोटीस पाठविण्यात आली आहे. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार पालिकेच्या नगररचना विभागाने नोटीस काढली आहे. दर्गेच्या बाजूला असलेले पत्र्याचे शेड, पक्के बांधकाम बेकायदेशीर असल्याचा प्रशासनाचा नोटीसमध्ये उल्लेख केला असून सात दिवसात खुलासा करण्यास सांगितले आहे. सात दिवसात खुलासा न केल्यास पालिका बुलडोझर चालवणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 


सात दिवसात खुलासा न केल्यास...


सामाजिक कार्यकर्त्यांनी नवश्या गणपती मंदिरात जाऊन दर्शन करत हजरत सैय्यद हसन रांझेशाह बाबा रहेमतुल्लाह अलैह दर्ग्याची पाहणी केली. त्यानंतर हा दर्गाच पूर्ण अनधिकृत असून हे बांधकाम पाडण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा, अशी त्यांनी मागणी केली. दरम्यान यावेळी कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकऱ्यांसह पोलिसांचा चोख बंदोबस्त दर्ग्याबाहेर तैनात करण्यात आला होता. एकीकडे दर्ग्याचे बांधकाम हटविण्याची मागणी केली जात आहे. संबंधित जागेची पाहणी केली जाईल आणि अनाधिकृत बांधकाम असेल तर नियमाप्रमाणे ते हटवले जाईल असे स्पष्टीकरण नाशिक महापालिका आयुक्तांकडून देण्यात आले होते. त्यानुसार आता महापालिका प्रशासनाने रीतसर नोटीस बजावून सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.