Nashik Abdul Sattar : गेल्या आठवडाभर सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, कृषीमंत्री अब्दुल सत्तार आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. 


सरकारी कर्मचाऱ्यांनी (Staff strike) आपला संप मागे घेतल्यानंतर राज्यभरात नुकसानग्रस्त भागातील शेती पिकांच्या पंचनामा करण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये (Nashik) देखील नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे केले जात असून आज कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांचा संप संपल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या नुकसानांचा आढावा घेण्याचं काम सुरू झालं आहे. नाशिकमध्ये नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू झाले असून चांदवड तालुक्यातील पन्हाळे गावात नुकसानीचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. या भागात टरबूज, कांद्याचं झालेल्या नुकसानाची पाहणी आणि पंचनाम्याच्या कामाला वेग आला आहे. 


नाशिक जिल्ह्यात (Nashik District) 15 दिवसात दोन ते तीन वेळा गारपीट झाली सुरुवातीला सात आठ मार्चमध्ये झाली.  त्यानंतर सलग चार दिवस या कालावधीमध्ये नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये गारपीट झालेली होती. दुसऱ्या टप्प्यात ज्यावेळेस गारपीट झाली. त्यानंतर पंचनामे करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी संपामुळे कर्मचारी उपस्थित नव्हते. आता सात दिवसांनंतर या कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला आहे. कर्मचारी कामावर जायला सुरुवात झालेली आहे. त्यानुसार जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. 


आठ हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान 


नाशिक जिल्ह्याचा प्राथमिक अंदाजानुसार आठ हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाल्याचे समजते आहे. काढणीला आलेले गव्हाची पीकं अक्षरशः आडवी झाली आहेत. तर ज्वारीच्या पिकाचे देखील नुकसान झाले आहेत. तसेच फळबागांना देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आधी अतिवृष्टीमुळे खरिपाचे हंगाम गेले आणि आता अवकाळी पावसाने रब्बीच्या पीकांचे नुकसान झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाकडून देखील पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. आज खुद्द कृषीमंत्री सत्तार यांनी नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. 


कृषीमंत्री अब्दुल सत्तार नाशिक जिल्हा दौऱ्यावर


कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून ते आज नुकसान ग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. आज दुपारी चार वाजेच्या दरम्यान चांदवड, निफाड तालुक्यातील काही गावांना भेट देणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहेत..