Nashik Corona Update : मुंबई, पुणे (Pune) जिल्ह्यापाठोपाठ आणि ठाणे (Thane) नाशिकमध्येही कोविडचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी एकाच दिवशी शहरात 12 कोविड रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा धोका अधिकच वाढला आहे. तर नाशिक ग्रामीणमध्ये आठ रुग्ण आढळून आल्याने धाकधूक वाढली आहे. 


गेल्या आठवड्यापासून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे नाशिक (Nashik) शहरात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 24 वर पोहचली आहे. शहरात कोविडसोबतच 'एच-3 एन-2' (H3N2) रुग्णही आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. त्यामुळे महापालिकेने आता 'टेस्ट', 'ट्रॅक' आणि 'ट्रिट' या त्रिसूत्रीच्या कामाला सुरुवात केल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे. 


दरम्यान, राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढू लागल्याची माहिती राज्य सरकारकडे आल्यानंतर नाशिक महापालिकेसह जिल्हा यंत्रणेला कोविडबाबत सज्ज राहण्याच्या सूचना गेल्या आठवड्यात दिल्या होत्या राज्यात एकीकडे कोविडचे रुग्ण वाढत असताना, सध्या वेगाने पसरत असलेल्या 'एच-3 एन-2 या फ्लूचा धोकादेखील वाढला आहे. शहरात 'एच-3 एन-2 देखील चार रुग्ण आढळले होते. गेल्या आठवड्यात दोन दिवसांत 12 करोना रुग्ण आढळले. तर सोमवारी एकाच दिवशी 12 रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून कामाला लागली आहे. 


नाशिक शहरात आणि जिल्ह्यात एकीकडे कोविडचे रुग्ण वाढत असल्यामुळे महापालिकेने आता चाचण्यांची संख्या वाढवली आहे. यापूर्वी शहरात 50 ते 100 पर्यंत दररोज कोविडच्या चाचण्या केल्या जात होत्या. परंतु, आता गेल्या आठवड्यापासून चाचण्यांची संख्या ही अडीचशे पर्यंत नेली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे टेस्ट, ट्रेक आणि ट्रिट या त्रिसुत्रीने काम सुरू केले असल्याचे वैद्यकीय विभागाचे म्हणणे आहे.


एकाच दिवशी 21 रुग्ण पॉझिटीव्ह 


नाशिक जिल्ह्यात करोनाबाधित आढळणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी 21 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आले.  यापैकी 12 रुग्ण नाशिक शहरातील असून, आठ रुग्ण जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे गर्दीमध्ये जाताना नागरिकांनी पुरेशी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. कोविड-19 मध्ये देखील अशीच लक्षणे आढळत असल्याने सरकारी रुग्णालयांत निदान चाचणी करून घेण्यात येत आहे. जिल्ह्यात 21रुग्ण बाधित आढळून आले असून, यामध्ये आठ जण ग्रामीण भागातील, एक रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहे. दिवसभरात 19 रुग्णांनी करोनावर मात केली. जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 50 पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी 24 जण शहरातील, 22 जण ग्रामीण भागातील तर चार रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. संभाव्य 33 रुग्णांचे अहवाल प्रलंबित असून ते सर्व ग्रामीण भागातील आहेत.