Nashik Accident : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात दररोज अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून जिल्ह्यातील अनेक मार्ग हे मृत्यूचे सापळे बनले आहेत. अशातच वणी पिंपळगाव रोडवर (Vani Pimpalgaon Road) भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात दोन सख्ख्या बहीण भावाला जीव गमवावा लागला आहे. आपल्या आई वडिलांसमोर दोन बहीण भावंडांचा मृत्यू (Death) झाल्याने कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 


दोनच दिवसांपूर्वी मालेगावच्या (Malegaon) अंजग गावाजवळ एका तरुणाच्या अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अशातच काल रात्री एक वाजेच्या सुमारास नाशिक (Nashik) जिल्ह्यातील वणी-पिंपळगाव रोडवर विचित्र अपघातात दोन ठार तर तीन जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात पिकप आणि दुचाकीमध्ये झाला असून यात सख्ख्या बहिण भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, या बहीण भावंडांसोबत आईवडीलही प्रवास करत होते. याचवेळी अपघात (Accident) झाल्यानंतर दोघं भावंडांचा मृत्यू झाला आहे. तर आई वडील गंभीर जखमी झाले आहेत. आई वडिलांसमोरच दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने आईवडिलांनी जागेवरच हंबरडा फोडला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईवडिलांसह ही दोन्ही भावंडे नातेवाईकांना भेटण्यासाठी गावाला निघाले होते. हे चौघेही वणीकडे जात होते. अशातच वणी पिंपळगाव मार्गावर समोरून आल्याने पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. तर आईवडील जखमी झाले आहेत. त्याचबरोबर पिकअप वाहनाने रस्त्याच्या कडेला गेल्याने बाजूला उभे असलेले इसम ही जखमी झाले. दरम्यान या अपघातात 15 वर्षीय साहिल सुनील शिरसाट आणि 12 वर्षीय स्नेहल सुनील शिरसाठ हे दोघे सख्खे बहिण भाऊ अपघातात ठार झाले आहेत. तर त्यांचे आई वडील सुनील बापू शिरसाट आणि सोनाली सुनील शिरसाट हे जखमी झाले असून सर्व ओझर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. यांच्यासह रमणाबाई अप्पा खवळे ही महिला देखील अपघातात जखमी झाली आहे. 


दरम्यान, अपघात झाल्यानंतर आईवडिलांना जागेवरच हंबरडा फोडला. स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. यातील जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करिता दाखल करण्यात आले आहे. तर या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या मृतांचा शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या अपघाताप्रकरणी गोकुळ रामहरी शेळके यास वणी पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास  सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. 


आईवडील झाले मुलांना पोरके... 


शिरसाठ कुटुंबाचा आईवडील आणि दोन्ही बहीण भावंड असा सुखी संसार होता. मात्र आजच्या अपघाताने सर्वकाही हिरावून घेतलं. हा अपघात इतका दुर्दैवी होता की, दोन सख्ख्या बहिण भावाचा जीव घेतला. बारा वर्षाच्या मुलीचा आणि पंधरा वर्षाच्या मुलाचा आपल्या आई-वडिलांनी डोळ्यासमोरच अंत बघितला. जे डोळे आपल्या मुलांना यशाच्या उंच शिखराकडे झेपावताना बघणार होते. त्याच डोळ्यांनी दोन्ही मुलांचा मृत्यू बघितला, असा दुर्दैवी प्रसंग या आई-वडिलांच्या नशिबी आला. आई-वडीलही आपल्या लेकरांवाचून पोरकी झाल्याचे चित्र पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते.