Maharashtra Nashik News: बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तथा 'बार्टी' (BARTI Student) ने पात्र ठवलेल्या अनुसूचित जातीमधील 861 संशोधक विद्यार्थ्याच्या फेलोशिपसाठी राज्य सरकारकडे पैसा नाही, यावर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल  विद्यार्थी करत आहे. अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक नाकेबंदी रोखण्यासाठी आता विद्यार्थी एकवटले असून ते राजभवनाचेही दरवाजे ठोठावणार आहेत.


गेला दीड महिना आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची राज्य सरकारने ससेहोलपट चालवली आहे. ती संतापजनक आणि दयनीय आहे, अशी भावना व्यक्त करणारे निवेदन आंबेडकरी चळवळीतील विचारवंतांनी तयार केले असून ते राज्यपाल रमेश बैस यांना दिले जाणार आहे.


संशोधक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची कोणतीही दखल न घेता सरकारने याबाबत हात झटकले आहेत. तर दुसरीकडे कुणबी मराठा समाजासाठी असलेल्या 'सारथी' आणि ओबीसी समाजासाठी असलेल्या महाज्योती यांनी त्यांच्याकडील संशोधक, संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिली आहे. सारथीने 856, तर महाज्योतीने 1226 संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. अशातच अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांबाबत सरकारने याबाबतीत हात का आखडते घेत आहेत, असा सवाल उपस्थित विद्यार्थ्यांनी केली आहे.


बार्टीमार्फत मूळ कागदपत्र पडताळणी तसेच विषय तज्ज्ञांमार्फत विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. यानंतर सर्व पात्र 861 विद्यार्थ्यांचा तपशील सामाजिक न्याय विभागास पाठवून सर्व विद्यार्थ्यांना पात्र ठरवून फेलोशिप देण्याबाबत लवकरात लवकर आदेश देण्यात यावेत. यावर सामाजिक न्याय विभागाने कोणताही निर्णय न घेतल्याने विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.


सरकारने विद्यार्थ्यांना न्याय द्यावा...


आमच्यातील बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहे. ज्या भागात मूलभूत सुविधा नाहीत, अशा भागातील असून ते खूप कष्ट करून पीएचडीपर्यंत पोहचले आहेत. काही जण सोडले, तर बहुतांश घरातील ही पहिली पिढी आहे. भूमिहीन, शेतमजूर, कष्टकरी, वीटभट्टी, घरकाम करणाऱ्यांची ही मुले आज आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. परंतु एक ना अनेक कारणे देत सरकार हक्काची फेलोशिप नाकारत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. 


सरळ सरळ शैक्षणिक नाकेबंदी


सारथी या संस्थेची 2023 या वर्षासाठीचीही फेलोशिपची जाहिरात आता प्रसिद्ध झाली आहे. मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना 2021 आणि 2022 ला सरसकट फेलोशिप दिली गेली आहे. दुसरीकडे, बार्टीची 2021 ची फेलोशिपची प्रक्रियाही पूर्ण झालेली नाही. अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांची ही सरळ सरळ शैक्षणिक नाकेबंदी आहे, अशा तीव्र भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. आमच्याकडे फक्त 200 विद्यार्थ्यापुरताच निधी आहे, असे राज्य सरकार सांगत आहे, असे या संशोधक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.