Nashik Lok Sabha 2024 : काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या शिवसेना मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केली. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या विरोधात सक्षम उमदेवार देण्यासाठी आता महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.  


शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे (Gokul Pingle) यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार गटातील इच्छुक उमेदवार गोकुळ पिंगळे यांना ठाकरे गटाकडून निवडणूक रिंगणात उतरवण्याची चाचपणी केली जात आहे. गोकुळ पिंगळे यांना ठाकरे गटात प्रवेश देवून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासंदर्भात खल सुरु आहे. 


सक्षम उमेदवाराची मविआकडून चाचपणी


गेल्या काही दिवसांपासून नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार यावर चर्चा सुरु आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर (Vijay Karanjkar) हे इच्छुक आहेत. त्यांना याआधी दोन वेळेस पुढच्या निवडणुकीत तुम्हालाच उमेदवारी मिळणार, अशा शब्द देण्यात आला होता. विजय करंजकर यांनी गेल्या काही दिवसांपासून तयारी देखील सुरु केली होती. परंतु आता महायुतीकडून (Mahayuti) हेमंत गोडसेंना जर तिकीट कन्फर्म झाले तर महाविकास आघाडीकडून त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवार पाहिजे म्हणून चाचपणी सुरु करण्यात आली आहे.


नाशिक लोकसभेबाबत शरद पवार-संजय राऊतांमध्ये चर्चा?


शरद पवार गटाचे गोकुळ पिंगळे हे गेल्या काही दिवसांपासून आक्रमकतेने प्रचार करत आहेत. त्यामुळे आता गोकुळ पिंगळे यांचे नाव आघाडीवर आलेले आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) आणि संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिकमध्ये होते. जवळपास दीड ते दोन तास त्यांनी एकाच गाडीत प्रवास केला. याच दरम्यान नाशिकच्या जागेवरून शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. 


ठाकरे गटाकडून गोकुळ पिंगळेंना उमेदवारी?


त्यामुळे ठाकरे गटाकडून गोकुळ पिंगळे यांना उमेदवारी द्यावी. नाशिकची जागा ठाकरे गटानेच लढवावी, अशा स्वरूपाच्या हालचालींना आता वेग आला असून, यासंदर्भात मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नाशिकची जागा नक्की कोणाला मिळणार याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. 


आणखी वाचा 


Nashik Lok Sabha 2024 : उमेदवाराबाबत निकाल होत नाही तोपर्यंत नाव जाहीर केलेच कसे? भुजबळांचा श्रीकांत शिंदेंना सवाल