Nashik Leopard News नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या (Leopard) घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अलीकडेच मालेगाव (Malegaon) शहरात एका लॉन्समध्ये बिबट्या शिरला होता. यावेळी एका चिमुकल्याने प्रसंगावधान दाखवत बिबट्याला एका खोलीत जेरबंद केले होते. या पाठोपाठ आता नाशिकच्या मखमलाबाद (Makhmalabad) परिसरात एकाच वेळी तीन बिबट्यांचा मुक्तसंचार दिसल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मखमलाबाद परिसरात अनेक ठिकाणी शेती केली जाते. याआधी या परिसरात अनेकवेळा बिबट्यांचा मुक्तसंचार दिसून आला आहे. मात्र बुधवारी रात्री एकाच वेळी तीन बिबटे दिसून आल्याने या परिसरात नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मखमलाबादच्या वडजाईमाता नगरात नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक (Ashok Murtadak) यांच्या या शेतीला लागून असणाऱ्या नाल्यातून बिबटे नागरी वसाहतीत आल्याचे दिसून आले.
फटाके फोडून बिबट्यांना पळवण्याचा प्रयत्न
त्यानंतर बिबट्यांनी एका प्रकल्पाच्या बांधकाम सुरू असलेल्या रेतीवर त्यांनी धुडगूस घालण्यात सुरुवात केली. यावेळी कामगारांना ती कुत्री असल्याचे वाटले होते. मात्र काही वेळातच कामगारांना ते बिबटे असल्याचे लक्षात आल्याने त्यांचे चांगलीच तारांबळ उडाली. कामगारांनी पत्र्याच्या खोल्यांमध्ये धाव घेत आसपासच्या रहिवाशांना याबाबतची माहिती दिली. परिसरात आरडाओरड सुरु झाल्याने बिबट्यांनी पळ काढला. मात्र बिबट्यांनी यावेळी एका कुत्र्यावर हल्ला केला. त्यानंतर नागरिकांनी फटाके फोडून बिबट्यांना पळवण्याचा प्रयत्न केला.
बिबट्याचा मुक्तसंचार सीसीटीव्हीत कैद
आज गुरुवारी सकाळी वडजाईमातानगर भागातील एका बंगल्याच्या मागील गवतात मजुराला बिबट्याची चाहूल लागली. वन विभागाच्या (Forest Department) कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परिसरातील शेतात बिबट्यांचे ठसे आढळून आले आहे. मुर्तडक यांच्या शेतातील सीसीटीव्हीत एका बिबट्याचा मुक्तसंचार कैद झाला आहे.
वडजाईमातानगर परिसरात शुकशुकाट
दरम्यान, ज्या नाल्यातून बिबट्या नागरी वस्तीकडे आले, तो नाला झाडाझुडपांनी वेढला आहे. या ठिकाणी बिबट्याला लपण्यासाठी बरीच जागा आहे. बिबट्यामुळे वडजाईमातानगर (Vadjaimatanagar), शांतीनगर (Shantinagar) भागात स्थानिकांमध्ये भीती पसरली आहे. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. परंतु, बिबट्याच्या धास्तीमुळे गुरुवारी सकाळी परिसरात शांतता दिसून आली. वन विभागाने या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांना केली आहे.
आणखी वाचा