Nashik News नाशिक : गेल्या काही दिवसांपासून महाप्रसादातून विषबाधा झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. महाशिवरात्री निमित्ताने देखील अशाप्रकारे भंडारा, महाप्रसादाचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात येणार असल्याने अन्न व औषध प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. 


महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून महाप्रसादातून विषबाधा होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे अन्न व औषध प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेतली आहे. आता महाप्रसादाचे आयोजन करायचे असल्यास त्याबाबतची नियमावली अन्न व औषध प्रशासनाने जारी केली आहे.


आता महाप्रसाद कार्यक्रमासाठी ऑनलाईन परवानगी घेणे बंधनकारक


महाप्रसादाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी शंभर रुपये शुल्कासह ऑनलाईन परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागणार आहे. तपासणीसाठी प्रशासनाची पथके देखील तयार करण्यात आली आहेत. नियमांचे पालन न केल्यास अन्न, सुरक्षा व मानके कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. 


अशा आहेत सूचना 



  • वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करा.

  • शुद्ध पाण्याचा वापर. 

  • कच्चे अन्नपदार्थ नोंदणीकृत परवानाधारकांकडूनच खरेदी करा.

  • महाप्रसाद बनवताना योग्य ती खबरदारी घ्या.

  • कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्या. 


अहमदनगर जिल्ह्यात 200 जणांना विषबाधा


अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून 200 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा येथील एका नवरदेवाच्या घरी झालेल्या हळदीच्या कार्यक्रमात हा प्रकार समोर आला. हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून झालेल्या विषबाधानंतर अनेकांना जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. ज्यात, 59 लोकांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. विषबाधा झालेल्यांमध्ये सात बालकांचा समावेश होता. 


बुलढाणा जिल्ह्यात 500 जणांना विषबाधा


बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा गावात एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर जेवणातून भगर आणि आमटी सर्व भाविकांना देण्यात आली. मात्र, भगर आणि आमटी जेवल्यानंतर गावातील जवळपास सर्वांनाच उलटी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. अंदाजे 450 ते 500  जणांना या जेवणातून विषबाधा (Food Poisoning) झाली होती.


इतर महत्वाच्या बातम्या 


Advay Hiray : अद्वय हिरेंचा कोठडीतील मुक्काम वाढला, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला


Sharad Pawar : मविआच्या जागावाटपादरम्यान शरद पवार नाशिकमध्ये; जाहीर सभेतून तोफ धडाडणार, निवडणुकीबाबत मोठी घोषणा करणार?