नाशिक : जिल्ह्यात बिबट्याने (Nasik Leopard News) हल्ला केलेल्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता सिन्नर (Sinnar) तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सिन्नर तालुक्यातील गोंदे येथे गुरुवारी रात्री घराच्या ओट्यावर लघुशंकेसाठी उभ्या असलेल्या नऊ वर्षाच्या मुलावर बिबट्याने (Leopard) आई-वडीलांसमोरच हल्ला करुन शेतात ओढून नेले. या घटनेत मुलाचा दुदैवी मृत्यू झाला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, समृध्दी महामार्गालगत बेंद मळा येथे रवींद्र तुळशीराम तांबे यांची वस्ती आहे. रवींद्र यांचा 9 वर्षाचा मुलगा प्रफुल्ल (भैया) हा रात्री घराच्या ओट्यावर उभा राहून लघुशंका करत होता. यावेळी प्रफुल्लचे वडील, आई व भाऊ घराच्या ओट्यावरच बसलेले होते. लघुशंका झाल्यानंतर तो घरात जाण्यासाठी निघाला असताना शेजारी असणाऱ्या मक्याच्या शेतातून आलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. 


बिबट्याने चिमुकल्याला शेतात नेलं ओढून


काही क्षणातच बिबट्याने प्रफुल्लला मक्याच्या शेतात ओढून नेले. प्रफुल्लला बिबट्याने ओढून नेताच आई वडिलांनी आरडाओरडा करत शेजारील नागरिकांना आवाज देऊन जागे केले. त्यानंतर सर्वांनी लाठ्याकाठ्या घेऊन त्याचा शोध घेतला. पंधरा मिनिटांनी मक्याच्या शेतात घरापासून ३०० मीटर अंतरावर प्रफुल्ल जखमी अवस्थेत आढळून आला. तोपर्यंत बिबट्याने प्रफुल्लला सोडून तेथून पळ काढला होता. 


उपचारापूर्वीच चिमुकल्याचा मृत्यू


कुटुंबियांनी त्यास तात्काळ सिन्नर येथे उपचारासाठी नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, वावी पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. वनविभागाला माहिती कळताच वन परिक्षेत्र अधिकारी मनिषा जाधव यांच्यासह सेवकांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच, सेवकांकडून परिसरातील नागरिकांना रात्रीच्यावेळी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रफुल्लवर झालेल्या हल्ल्यानंतर वनविभागाने परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे. येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर प्रफुल्लचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.


शोकाकुल वातावरणात चिमुकल्यावर अंत्यसंस्कार


प्रफुल्ल हा गोंदे येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत होता. गावात शोकाकुल वातावरणात प्रफुल्लवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंधरा दिवसांपूर्वी याच कुटुंबाच्या मालकीच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला होता यात त्या कुत्र्याचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी याच परिसरातील पाळीवर कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला होता. या परिसरात नेहमीच बिबट्याचा मुक्तसंचार बघायला मिळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण 


पाच दिवसांपूर्वी दातली येथील सोमनाथ भागूजी भाबड यांच्या गायीवर बिबट्याने हल्ला करत गाय ठार केली. आधी पशुधनावर बिबट्याचे हल्ले होत. मात्र, आता लहान मुलावर हल्ला झाल्याचे शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. खंबाळे परिसरात वनविभागाचे मोठे क्षेत्र असल्याने वनविभागाचे कर्मचारीच दुसरीकडे पकडलेले बिबटे या क्षेत्रात आणून सोडत असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. तसेच तालुक्यातील प्रत्येक भागात बिबट्यांची संख्या वाढली असल्याने शेतकऱ्यांना शेतीचे कामे करण्यासही अडचण निर्माण झाली. रात्रीच्यावेळी पिकांना पाणी देण्यास शेतकरी धजावत नसून यामुळे पिकांचेही नुकसान होत आहे.


आणखी वाचा


Nashik Leopard News : मालेगावात मध्यरात्री पोल्ट्रीत शिरला बिबट्या, 40 कोंबड्या दगावल्या, गावकऱ्यांनी आरडाओरड करताच ठोकली धूम