नाशिक : जिल्ह्यात बिबट्याच्या (Leopard) हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता मालेगाव (Malegaon) तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या रामपुरा शिवारात (Rampura Shivar) एका पोल्ट्री (Poultry) शेडमध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली. या बिबट्याने पोल्ट्री शेडमध्ये धुमाकूळ घालत कोंबड्यांवर (Chickens) हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास 40 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की, मालेगाव तालुक्यातील रामपुरा शिवारात बाबाजी सोनवणे यांची पोल्ट्री शेडमध्ये आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास कोंबड्यांचा अचानक ओरडण्याचा आवाज आल्याने शेडच्या जवळच असलेल्या घराच्या ओट्यावर झोपलेले बाबाजी सोनवणे जागे झाले. त्यांनी मुलगा पंकज यास झोपेतून उठवत या शेडची पाहणी करण्यास सांगितले. यावेळी लोखंडी तारांची जाळी तोडून बिबट्या शेडमध्ये शिरल्याचे त्यांना लक्षात आले. 


लोकांचा जमाव जमला अन् बिबट्याने ठोकली धूम 


हा प्रकार शेजारील शेतकऱ्यांना तसेच गावातील इतर लोकांना समजताच पोल्ट्री शेडजवळ लोकांचा जमाव जमला. यावेळी लोकांनी बॅटरीच्या सहाय्याने बिबट्याच्या दिशेने प्रकाशझोत टाकला. त्यामुळे बिबट्याने जी शेडची जाळी तोडली होती. त्या जाळीतून बिबट्याने पहाटेच्या सुमारास बाहेर पडत धूम ठोकली. दरम्यान, सोनवणे यांच्या पोल्ट्री शेडपासून जवळच जंगलाचा परिसर आहे. भक्ष्याच्या शोधात बिबट्या पोल्ट्री शेडमध्ये शिरला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


नांदूरशिंगोटे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार


नांदूर शिंगोटे परिसरामध्ये गेल्या आठ दिवसांपासून शेतकऱ्यांच्या पशुधनावर दररोज हल्ले होण्याचे प्रकार सुरू असून वनविभागाने याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तरश्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या योगेश शेळके यांच्या वस्तीनजीक त्यांचा मेंढ्या व शेळ्यांचा कळप वळण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानकपणे झाडांमधून बिबट्याने येऊन शेळीला पळवून नेऊन ठार केले. हा प्रकार मेंढपाळाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या शेळी घेऊन फरार झाला. तसेच चार ते पाच दिवसांपूर्वी त्यांचे बंधू शिवाजी शेळके यांच्याही गाय व कुत्र्यावर बिबट्याने रात्रीच्या सुमारास हल्ला केला होता. मात्र सुदैवाने त्यामध्ये दोन्ही जखमी झाले. मात्र बिबट्या पळून जाण्यात यशस्वी झाला होता.


इतर महत्वाच्या बातम्या


Nashik Leopard News : बापरे! नाशिकमध्ये एकाच वेळी तीन बिबट्यांचा मुक्तसंचार, नागरिकांमध्ये घबराट


Nashik Leopard News : बिबट्याच्या हल्ल्यात 31 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू; इगतपुरी तालुक्यातील घटना