Nashik Leopard News : नाशिक जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या (Leopard Attack) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच इगतपुरी तालुक्यातील धार्णोली (Dharnoli) येथे बिबट्याने शाळकरी विद्यार्थ्यांवर हल्ला केला होता. मात्र एका विद्यार्थ्याने यशस्वीपणे बिबट्याचा हल्ला परतवून लावला होता. 


आता पुन्हा इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) निशाणवाडी (त्रिंगलवाडी) येथे बिबट्याने आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास तरुणीवर हल्ला केला. यात तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मीनाक्षी शिवराम झुगरे (31) असे तिचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 


दबा धरून बसलेल्या बिबट्याने केला हल्ला


आज पहाटेच्या सुमारास मीनाक्षी ही तरुणी घराबाहेर पडल्यानंतर बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप मारली. यात तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. घटनेबाबत माहिती मिळताच प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 


पिंजरा लावण्याची मागणी


निशाणवाडी भागासह बिबट्या असलेल्या तालुक्याच्या सर्व भागात तत्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा. दुर्दैवी पीडित तरुणीच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. वन विभागाकडून याप्रकरणी दखल घेण्यात आली आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.


कोटमगावला बिबट्या जेरबंद


भगवंत रामा घुगे 26 जानेवारीला हे घराच्या ओट्यावर बसलेले असताना त्यांच्या पाठीमागून बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. कोटमगाव परिसरात ही घटना घडली होती. प्रसंगावधान राखीत घुगे यांनी दोन्ही हाताच्या ताकदीने बिबट्याला दूर लोटले आणि जोरजोरात आरडाओरड केली. या हल्ल्यात घुगे यांच्या डोक्याला बिबट्याचे नख लागले होते. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनविभागाने कोटमगाव परिसरात पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात बिबट्या अखेर जेरबंद झाला. 


बिबट्याशी दिली कडवी झुंज


इगतपुरी तालुक्यातील धार्णोली (Dharnoli) येथे योगेश,  प्रवीण, नीलेश व सुरेश या विद्यार्थ्यांवर घरातून शाळेच्या दिशेने जाताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. यावेळी योगेश रामचंद्र पथवे याने आपल्या प्राणाची पर्वा न करता मित्रांना बाजूला ढकलत बिबट्याशी कडवी झुंज दिली. बिबट्याचा हल्ला (Leopard Attack) योगेशने परतवून लावला. मात्र या घटनेत तो जखमी झाला. वारंवार प्रतिकारासह अन्य मित्रांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या जंगलाच्या दिशेने पळून गेला. जखमी योगेशला उपचारासाठी घोटी (Ghoti) येथील खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले.


आणखी वाचा 


Nashik News : काँग्रेस, ठाकरे गटानंतर आता शरद पवार गटाचाही नाशिक लोकसभेवर दावा, महाविकास आघाडीत बिघाडी होणार?