नाशिक : मुंबई-पुण्यासह नाशिकमधील (Nashik) ड्रग्स रॅकेट उघडकीस आल्यानंतर तरुण मुलं ड्रग्जचं सेवन करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ कुठले आहेत, त्याचा शोध घेऊन ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त (Drug Racket) करण्याचं आव्हान नाशिक पोलिसांसमोर आहे. यावरुनच खासदार संजय राऊत (sanjay Raut)  यांनी गृहमंत्री गप्प का आहेत? असा प्रश्न विचारला. तसंच पंजाब आणि गुजरातप्रमाणे 'उडते नाशिक' झालंय का असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे. 


गेल्या काही दिवसांपासून नाशिकचं (Nashik) ड्रग्ज प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. यामुळे आता राजकीय नेत्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. सुरवातीला सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी या प्रकरणी दादा भुसे (Dada Bhuse) यांची चौकशी करण्याची मागणी केली. मात्र या आरोपांचे भुसे यांनी खंडन करत चौकशी करा असे प्रतिआव्हान केले. त्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा भुसे यांचे नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणाशी लागेबांधे असल्याचे सांगत नव्या वादाची ठिणगी पडली. त्यानंतर काल उशिरा संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी देखील नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणाचा उल्लेख करत नशेच्या माफियांना कोण पाठीशी घालतंय, अन पंजाब, गुजरातप्रमाणे 'उडते नाशिक' झालंय का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. 


संजय राऊत म्हणाले की, नाशिक ड्रग्स प्रकरणा (Nashik drug Factory) संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राची काळजी असेल तर नाशिकमधील ड्रग्स प्रकरणाची चौकशी करतील. ललित पाटील ससूनमध्ये इतके दिवस कसा राहिला, तो जेल मधून कसा बाहेर आला? त्याला कुठल्या भाजपाच्या माणसाने मदत केली हे सगळ रेकॉर्डवर आलेले आहे, असेही राऊत म्हणाले. सर्वात आधी दादा भुसे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, ते पुरावे संदर्भात छेड- छाड करत असल्याचे खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच गिरणा सहकारी साखर कारखान्यासंदर्भात दादा भुसे यांनी शेतकऱ्यांचे 178 कोटी रुपयांचे अपहार केला आहे. या प्रकरणी मला दादा भुसे यांची नोटीस आली आहे. दादा भुसे यांनी कितीही खटले दाखल केले तरी हे लपून राहणार नाही. मी या संदर्भात ईडी कडे तक्रार केली असून 2024 मध्ये तरी कारवाई होईल, असे सूतोवाच संजय राऊत यांनी दिले आहेत. 


छगन भुजबळ खोटं बोलत आहेत.... 


सध्या सुरु असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या सुनावणीबाबत ते म्हणाले की, अपेक्षा काय असणार आहे, गेल्या वर्षभरापासून विधानसभा अध्यक्ष वेळ काढूपणा करत आहेत. विधानसभा अध्यक्षांनी संविधान आणि कायदाचा मुडद्दा पाडलेला आहे. न्यायालयाने सांगून देखील निर्णय झाले नाही. तर भुजबळांवर टीका करताना ते म्हणाले की, याआधीच भाजप राष्ट्रवादी एकत्र येणार असे भुजबळ खोटं बोलत आहेत. महविकास आघाडी ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. महाविकास आघाडी सुरू असताना भुजबळ नुकतेच तुरुंगातून सुटून आले होते. भुजबळ आता काय म्हणत आहेत, याला महत्व नाही. त्यांना मंत्रिपद हव होत आणि ईडी पासून संरक्षण हव होत, म्हणून ते तिथे आहेत, मात्र फाईल कधी बंद होत नसल्याचे संजय राऊत म्हणाले. 


ड्रग्जच सेवन करतानाचे व्हिडीओ व्हायरल? 


मुंबई पुण्यासह नाशिकचे ड्रग्स रॅकेट उघडकीस आल्यानंतर तरुण मुलं ड्रगच सेवन करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नाशिकच्या शिंदे गावात ड्रग्स बनविणारी फॅक्टरी मुंबई पोलिसांनी उध्वस्त केली. त्यापाठोपाठ नाशिक पोलिसांनी एका गोडावून मध्ये छापा मारून कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आणि एका कारवाईत वडाळा गावातून दोघा ड्रग्स तस्करांना अटक केली. या कारवाया होत असताना ड्रग्सच्या आहारी जाणाऱ्या तरुणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हिडिओ कुठले, त्याचा शोध घेऊन ड्रग्स रॅकेट उध्वस्त करण्याचे नाशिक पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. 



इतर महत्वाची बातमी : 


Sushma Andhare : 'माफी मागा, माफी मागा', ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे विरोधात जोडेमारो आंदोलन, नाशिकमध्ये शिंदे गट आक्रमक