नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू झाला. पहिल्या घटनेत सिन्नर-घोटी महामार्गावर मंगळवारी सकाळी ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात (Accident) दोन दुचाकीस्वार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. तर दुसऱ्या व घटनेत मालेगावहून (Malegaon) कळवणच्या दिशेने जाणाऱ्या बुलेटस्वार शिक्षकाचा चिंचावड-निंबोळा रस्त्यावर कारच्या धडकेत मृत्यू झाला. 


नाशिकसह जिल्ह्यात सातत्याने होणारे अपघात (Nashik Accident) चिंतेची बाब ठरत आहे. एकाच दिवशी जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सिन्नर-घोटी महामार्गावर हरसुले येथे ट्रक व दुचाकीत झालेल्या अपघातात कोनांबे येथील दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कोनांबे गावावर शोककळा पसरली आहे. गणेश भगीरथ डावरे , दुर्गेश हेमंत डावरे असे मृत झालेल्यांची नावे आहेत. दोघे दुचाकीवरून सिन्नरकडे येत होते. हरसुलेजवळ घोटीकडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी रुग्णवाहिका बोलवत सिन्नर ग्रामीण रुग्णालयात (Sinner Hospital) दाखल केले. मृत दुर्गेश एकुलता एक होता. महाविद्यालयात शिक्षणासह माळेगाव औद्योगिक वसाहतीत काम करत होता. सैन्यदल, पोलिस भरतीसाठी तयारी सुरू होती. त्याच्या पश्चात आई वडील, बहीण असा परिवार आहे. गणेश शिक्षणासह भाजीपाला विक्री व्यवसाय करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, दोन बहिणी आहे. 


गणेश आणि दुर्गेश हे सकाळी दुचाकीने कोनांबेहुन सिन्नरकडे निघाले होते. त्यांची दुचाकी हरसुले गावाजवळील मराठी शाळेसमोर असताना समोरून विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात दोघे युवक ट्रकच्या पुढील बाजूला धडकून रस्त्यावर फेकले गेले. यात दोघांच्याही डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा रस्त्यावरच मृत्यू झाला. डोक्यातुन मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. स्थानिकांनी तात्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांना मृत घोषित करण्यात आले. दरम्यान ग्रामीण रुग्णालयात सकाळी 12 पासून मृतदेह ठेवले होते. मात्र, दोनपर्यंत डॉक्टर न फिरकल्याने माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Vaje) यांनी दोडी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांना आणत शवविच्छेदन झाले.


शिक्षकाचा अपघातात मृत्यू


तर दुसरी घटना देवळा (Deola) तालुक्यात घडली आहे. मालेगावहून कळवणच्या दिशेने जाणाऱ्या माध्यमिक शिक्षकाचा चिंचावड-निंबोळा रस्त्यावर बुलेट व कार अपघातात मृत्यू झाला. राजेंद्र प्रताप सूर्यवंशी असे मृत शिक्षकाचे नाव असून, ते बोरगाव येथील धैर्यशीलराव पवार विद्यालयात कलाशिक्षक होते. त्यांच्या बुलेटला मागून येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. यावेळी ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. काही स्थानिकांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. 


इतर महत्वाची बातमी : 


Pune Accident : सिग्नल सुटला अन् भरधाव वेगात कंटेनरनं दुचाकीला चिरडलं; आई-वडिल्यांच्या डोळ्यादेखत जुळ्या मुलींचा करुण अंत