नाशिक : 'मी ससून रुग्णालयातून (Sasun hospital) पळालो नाही, मला पळवलं गेलं, यामध्ये कोणाकोणाचा हात आहे मी सगळं सांगणार, असं खळबळजनक गौप्यस्फोट ड्रग माफिया ललित पाटीलनं अटकेनंतर केला. शिवाय पोलीस त्याच्या मागावर असताना तो नाशिकमध्ये काही दिवस वास्तव्यास होता, अशीही धक्कादायक माहिती समोर आली. यामुळे आता नाशिकमधील (Nashik) राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले असून ललित पाटीलने (lalit Patil) सांगितल्याप्रमाणे कुणाकुणाचे हात या प्रकरणांत रुतलेले आहेत, हे लवकरच समोर येईल.
नाशिक (Nashik) शहरातील शिंदे गावात ड्रग्जची फॅक्टरी (Drug Factory) सुरु असल्याचं प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर नाशिकमधीलच ललित पाटील आणि भूषण पाटील हे दोघे भाऊ यांचा हात असल्याचे समोर आले. त्याचवेळी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेला ललित पाटील मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी झाल्याने हे प्रकरण चांगलेच गाजले. त्यानंतर नाशिक, पुणे, मुंबई पोलिसांची संबंधित तपासाच्या कामात असताना अचानक सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी या प्रकरणात शिंदे गटाच्या नेत्यांच्या हात असल्याचा आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. यानंतर संबंधित राजकीय नेत्यांनी देखील या प्रकरणात आपला काहीही संबंध नसल्याने सांगत चौकशी करा असे प्रतिआव्हान देखील केले. हे सर्व सुरु असतानाच मुंबई पोलिसांनी (Mumbai) श्रीलंकेत पळून जात असलेल्या ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या.
दरम्यान तब्बल पंधरा दिवसांच्या तपासांनंतर ललित पाटीलला चेन्नईमधून (Chennai) अटक करण्यात पोलिसांना यश आले. आज सकाळी जोगेश्वरी येथील रुग्णालयात वैद्यकीय तपासणी नेत असताना मात्र ललित पाटीलने मोठा गौप्यस्फोट केला. 'मी लवकरच माध्यमांशी संवाद साधणार आहे. मी ससून रुग्णालयातून पळालो नाही, तर मला तिथून पळवण्यात आलं. यामध्ये कोणाकोणाचा हात आहे, हे मी सगळं सांगणार आहे." या ललित पाटीलच्या वक्तव्यामुळे मात्र नाशिकमधील काही नेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. शिवाय याचबरोबर या पंधरा दिवसांत ललित पाटील विविध शहरात फिरत होता. यामध्ये नाशिकमध्ये सुद्धा तो काही दिवस वास्तव्यास असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली. तो नाशिकमध्ये असताना कुणालाच कसा थांगपत्ता लागला नाही. मग तो कोणाच्या आश्रयाने नाशिकमध्ये राहत होता, का नाशिकमधीलच राजकीय नेत्यांचा (Polittical Leaders) हात त्याच्या पाठीशी होता, म्हणून तो बिनधास्त नाशिकमध्ये मुक्तसंचार करत होता, अशा अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले आहेत. त्यामुळे आता याचा नेमका कसा होतो यावर या प्रकरणाचे धागेदोरे अवलंबून आहेत.
राजकीय वरदहस्त कुणाचा?
तर ससून रुग्णालयातून जेव्हा ललित पाटील फरार झाला. तेव्हा त्याच्या शोधासाठी मुंबई साकीनाका पोलिसांची एक टीम नाशिकला पोहचली होती. त्याचवेळी नाशिकमध्ये ड्रग्ज निर्मितीचा कारखाना आढळून आला. आणि ललित पाटीलचे नाशिक कनेक्शन समोर आले. यानंतर लागलीच त्याच दिवशी नाशिक पोलिसांना (Nashik Police) वडाळा गावात ड्रग्ज रॅकेट उध्वस्त करण्यात यश आले. यात गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात असलेल्या छोटी भाभीसह तिच्या साथीदारांना अटक करण्यात आली. त्यावेळी 'भाभीला सांभाळून घ्या' असा कॉल पोलिसांना एका लोकप्रतिनिधीकडून आल्याचे बोलले जात आहे. त्यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील हा संदर्भ विशद केला होता. त्यामुळे छोटी भाभीला अभय देणारा राजकीय नेता कोण अशी चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे एकीकडे छोटी भाभी आणि ललित पाटील याच्या गौप्यस्फोटामुळे नाशिकमधील कोणत्या राजकीय नेत्यांचा यात हात आहे, हे पोलिसांच्या तपासानंतर समोर येईल.
ललितचा नाशकात मुक्तसंचार
ससुन रुग्णालयातून पळ काढल्यानंतर ललित पाटील अनेक दिवस नाशिकमध्येच होता. नाशिक पोलीस, पुणे पोलीस तसेच मुंबई पोलीस मागावर असताना देखील ललित पाटील नाशिकमध्येच कसा? त्याला कोणाचा राजकीय पाठींबा होता का? तपास यंत्रणांच्या शोध कार्याला गती येताच ललित पाटीलनं नाशिकमधून पळ काढला. त्यानंतर इंदोरला गेला, तिथून तो सूरतमध्ये गेला आणि पुन्हा नाशिक धुळे औरंगाबाद करत कर्नाटकात प्रवेश केला. बंगळूरवरून चेन्नईला जात असताना साकीनाका पोलिसांनी ललित पाटीलला अटक केली. चेन्नईवरुन ललित श्रीलंकेला जाणार होता, अशी माहिती मिळत आहे.
इतर महत्वाची बातमी :