नाशिक : संभाजीराजे छत्रपती आज (ता. 24 सप्टेंबर) पुन्हा नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक शहरातील विविध कार्यक्रमांना भेटी देणार आहेत. त्याचबरोबरोबर स्वराज्य संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार असून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा दौरा महत्वाचा असणार आहे. शिवाय छत्रपती संभाजीराजे हे सातत्याने नाशिक दौरे करत असल्याने आगामी काळात नाशिकमधून निवडणूक लढविणार असल्याचे चित्र स्पष्ट होते आहे. 


नाशिक शहरात सातत्याने अनेक नेत्यांचे राजकीय दौरे सुरु असून यात संभाजीराजे छत्रपती यांनी दौऱ्यांची मालिकाच सुरु ठेवली आहे. काही दिवसांपूर्वीच ते दोनदिवसीय नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. यात त्यांनी अनेक भागात जाऊन लोकांशी संवाद साधला. अनेक ठिकाणी जाहीर सभांचे आयोज़न करण्यात आले होते. येवला येथील त्यांची सभा चांगलीच गाजली. या सभेत त्यांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत येवल्याच्या विकासाबाबत प्रश्नांची सरबत्तीच केली. त्याचबरोबर नाशिकमध्ये स्वराज्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे कार्यालयाचे उद्घाटन त्यावेळी करण्यात आले होते. त्यामुळे संभाजीराजे यांचे दर 15 दिवसांनी नाशिकमध्ये दौरे होत आहेत. 


आज संभाजीराजे छत्रपती यांचा नाशिक शहरात दौरा असून आज सकाळी ते पुणे येथून नाशिककडे प्रस्थान करतील. त्यानंतर ते सव्वादहा वाजेच्या सुमारास जय शंकर लॉन्स नाशिक येथे दाखल होतील. साडे दहा ते बारा वाजेपर्यंत याच परिसरात सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून होत असलेल्या कार्यक्रमाला ते उपस्थिती लावणार आहेत. त्यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. त्यानंतर दुपारी ते नाशिक शहरातील शासकीय विश्रामगृहात दाखल होणार आहेत. या ठिकाणी विविध बैठकांना ते हजेरी लावणार आहेत. त्याचबरोबर नाशिक शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार आहेत. दरम्यान सत्यशोधक समाजाचे ४१ महाराष्ट्र राज्य अधिवेशन नाशिकमध्ये पार पडत असून या कार्यक्रमाला संभाजीराजे छत्रपतींसह छगन भुजबळ देखील उपस्थित असणार आहेत. 


आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी?


दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेने देखील मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे नाशिकमधून रिंंगणात उतरण्यासाठी तयारी तर सुरु नाही ना? अशी चर्चा रंगली आहे. संभाजीराजे छत्रपती नाशिकमधून निवडणूक लढविण्यासाठी तयारी करत असल्याचा चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात अनेक दौरे हे नाशिकला होत आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागही ते पिंजून काढत आहेत. 


इतर महत्वाची बातमी : 


Lok Sabha Election 2024 : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष किती जागांवर लढणार? संभाजीराजे म्हणतात...