नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) सातत्याने गुन्हेगारीच्या (Crime) घटना घडत असताना आता बाटलीत पेट्रोल दिले नाही, या किरकोळ कारणास्तव पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या. गेल्या दोन दिवसात विविध तिन पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना टवाळखोरांकडून मारहाणीच्या तिन घटना समोर आल्याने नाशिक पेट्रोल डिलर्स (Nashik Petrol Dealers) असोसिएशनकडून या घटनांचा निषेध व्यक्त करण्यात येतो आहे. दोन दिवसात आरोपी शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा असोसिएशनकडून देण्यात आला आहे.
नाशिक शहरातील (Nashik) तीन पेट्रोलपंपावर टोळक्यांनी धुडगूस घालत व्यवस्थापकांवर जीवघेणा हल्ला (attack) केल्याच्या घटना घडल्या. त्यातील एका घटनेत झालेल्या मारहाणीत व्यवस्थापकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनांमुळे मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणाऱ्या पेट्रोलपंपांच्या सुरक्षेसह पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. हल्ल्याच्या दोन्ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्या आहेत. तर मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी येथील संजीवनी ऑटो फ्युल्स पंपावर रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पाच जण स्कॉर्पिओतून आले. चौघांनी गाडीत 400 रुपयांचे डिझेल भरले. त्यानंतर काटा उलटा नाही असे म्हणत चौघांनी पेट्रोलपंपावर राडा घातला. चौघांनी पंपावरील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाण करून पंपव्यवस्थापकाला वाहनाने धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर परिसरात एम. एस. देवरे यांचा पेट्रोलपंप आहे. या पेट्रोल पंपावर तुषार बापू पवार हे व्यवस्थापक म्हणून काम करतात. शनिवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास दुचाकीवर एक युवक आला. त्याने कामगाराकडे बाटलीत पेट्रोल मागितले. कामगाराने बाटलीत पेट्रोल देण्यास नकार दिला. त्यानंतर युवकाने पंपव्यवस्थापक तुषार पवार यांच्याकडे गेला. त्याने बाटलीत पेट्रोल मागितले. त्यावेळी पवार यांनी शासकीय नियमानुसार बाटलीत पेट्रोल देता येणार नाही, असे सांगितले. त्याचा राग आल्याने युवकाने कॉल करून तीन मित्रांना बोलावून घेतले. काही वेळात तीन जण आले. चार जणांनी संगनमत करत तुषार पवार यांना बेदम मारहाण करण्यास केली. यावेळी पेट्रोल मागणाऱ्या युवकाने हातातील फायटर पवार यांच्या डोक्यात मारले. त्यात ते जखमी झाले. मारहाणीची सर्व घटना पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मात्र अनेक ठिकाणी सर्रास बाटलीमध्ये पेट्रोल दिलं जात...
एकीकडे नाशिक शहरातील पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना बाटलीमध्ये पेट्रोल दिले नाही, म्हणून मारहाण करण्यात आली. मात्र दुसरीकडे अनेक पेट्रोल पंपावर सर्रासपणे बाटलीमध्ये पेट्रोल दिले जाते. याकडे पेट्रोल पंप चालकांचे दुर्लक्ष असल्याचे दिसते आहे. मात्र दुसरीकडे पेट्रोल पंपचालकांकडून कायद्याचे पालन केले जात असल्याचे सांगत बेशिस्त वाहनचालकांकडून कामगारांवर हल्ला केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. दोन दिवसात आरोपी शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा ईशारा असोसिएशनकडून देण्यात आला असून आज दुपारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.
इतर महत्वाची बातमी :
Supriya Sule: पेट्रोल, डिझेलच्या महागाईवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला