नाशिक : नाशिकसह (Nashik) विभागातील लाचखोरी (Corruption) सतत वाढत असून अहमदनगर (Ahmednagar) येथील एक कोटींचे लाच प्रकरण ताजे असतानाच आता नाशिकमधून एक प्रकरण समोर आले आहे. जप्त केलेला ट्रक सोडवण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपयांची लाच (Bribe) मागत 35 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस हवालदारासह एका युवकास लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. 


नाशिकमध्ये लाचखोरी सुरूच


नाशिक विभागात (Nashik Divison) गेल्या काही दिवसात सातत्याने लाचखोरीच्या घटना समोर येत आहेत. मागील आठवडाभरात चार कारवाया करण्यात आल्याने लाचखोरीची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे समोर आले आहे. दरम्यान, नाशिकमध्ये आणखी एक लाचखोरीची कारवाई समोर आली आहे. पोलिस कारवाईदरम्यान जप्त केलेला ट्रक सोडविण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्रयस्थ व्यक्तीमार्फत 35 हजार रुपये घेणाऱ्या पोलिसासह मध्यस्थाला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली. नाशिक पोलिस (Nashik Police) ठाण्यातील अंमलदार रवींद्र बाळासाहेब मल्ले आणि मध्यस्थ तरुण मोहन तोंडी अशी संशयितांची नावे आहेत.


पोलीस हवालदारासह एका युवकाला अटक


नाशिक तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला हवालदार रवींद्र बाळासाहेब मल्ले हा विल्होळी पोलीस चौकी येथे कर्तृव्य बजावत होता. या ठिकाणी एका ट्रकवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. हा ट्रक सोडवण्याच्या मोबदल्यात मल्ले याने तक्रारदाराकडे 1 लाख रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने तक्रारीची शहानिशा करत सापळा रचला. तडजोड करत मल्ले याने 70 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे मान्य केले. पंचवटीतील हिरावाडी येथील ट्रान्सपोर्ट व्यवसायातील संशयित तरुण तोडी याने तक्रारदाराकडून लाचेची 35 हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. एसीबीच्या पथकाने त्याला अटक केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात हवालदार मल्ले याच्यासह तरुण तोडी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.


एक कोटींची लाच घेतल्याप्रकरणी अमित गायकवाडला जामीन


एक कोटीची लाच घेतल्याप्रकरणी सहाय्यक अभियंता अमित गायकवाडला जामीन मंजूर करण्यात आला. अडीच कोटींच्या कामासाठी एक कोटीची लाच घेताना गायकवाडला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर मुदत संपल्यानं त्याला काल न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. दरम्यान या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असल्याने जामीन मिळावा तसेच महत्त्वाच्या व्यक्तींची साक्ष घेण्यात आली. त्यानंतर वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर गायकवाडला जामीन मंजूर करण्यात आला. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


Ahmednagar : 'तुझ्या कष्टामुळेच चांगलं फळ मिळाले', लाच घेतल्यानंतरचं शेवटचं वाक्य, अहमदनगरमध्ये एसीबीची सर्वात मोठी कारवाई