नाशिक : महाराष्ट्रात दुष्काळ (Maharashtra Drought) जाहीर करा अशी मागणी सध्या जोर धरु लागलेली असतानाच नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दुष्काळाचे एक भीषण वास्तव समोर आले आहे. पावसाने पाठ फिरवल्याने पिण्याच्या पाण्याची (Water Crisis) अडचण निर्माण झाली आहे, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, कांदा उत्पादक शेतकरी (Farmers) संकटात सापडला आहे तर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. एवढंच काय तर गावातल्या मुलामुलींची लग्नही लांबल्याचं शेतकरी सांगत आहेत.
कृषीप्रधान जिल्हा म्हणून खरंतर नाशिकची (Nashik District) ओळख. निसर्गाचं वरदान लाभलेला परिसर म्हणून नाशिकची ओळख. मात्र याच नाशिक जिल्ह्यातील अनेक भाग हा पावसाळ्यात कोरडाठाक पडत चालला आहे. अनेक गावं सध्या तहानलेली असून पावसाने पाठ फिरवल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस नसल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान चांदवड (Chandwad) तालुक्यातील निमगावमध्ये अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्याचे दोन ते तीन दिवस शिल्लक असून समाधानकारक पाऊस न झाल्याने चक्क पिकांना तांब्या-तांब्याने पाणी देण्याची वेळ शांताराम गांगुर्डे आणि सुनीता गांगुर्डे या झेंडूची शेती करणाऱ्या दाम्पत्यावर आली आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दोन हजार झेंडूची रोपं लावली होती. मात्र पाऊसच नसल्याने गांगुर्डे दाम्पत्याला टँकरने पाणी मागवून ते विहिरीत तसेच ड्रममध्ये भरावे लागते आणि त्यानंतर दिवसातून दोन वेळा असे पाणी दिले जाते. आजवर पहिल्यांदाच अशी वेळ आमच्यावर आल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले.
निमगावपासून पुढे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या उर्दूळ गावी तर उन्हाळ्यात दुष्काळ पडतो. तशी परिस्थिती ऑगस्टच्या शेवटी निर्माण झाली आहे. पिकं, जनावरांसाठीच काय पण पिण्यासाठीही पाणी नसल्याने शेतकऱ्यांना चार हजार रुपये खर्च करत आठवड्यातून एकदा टँकर बोलवावे लागतात. विशेष म्हणजे पाण्याची मागणी वाढल्याने टँकरसाठीही त्यांना 4-5 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत असल्याचं गावचे शेतकरी मनोहर कुटे सांगतात, रात्रीच्या वेळी टँकर आले तर शेतकऱ्यांची अर्धी रात्र या कामातच निघून जाते.
लासलगावजवळील (Lasalgaon) उर्दूळ गावचेच भाऊसाहेब कुटे स्वतः कांदा उत्पादक शेतकरी आहेत. शेतात कांदा लावण्यासाठी त्यांनी यंदा रोपं तर घेतली मात्र पाऊसच नसल्याने अक्षरशः ती रोपं जळून गेली आहेत. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा तर दुसरीकडे कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्क (Onion Export) लागू करण्याचा निर्णय सरकार घेत असल्याने शेतकरी संकटात सापडल्याची भावना कुटे यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे पाऊस नाही, त्यामुळे पिके घेता येत नाही आणि यामुळे आमचे अर्थकारण बिघडले असून नातेवाईकांमधील अनेकांची लग्नही होत नसल्याचं ते सांगतात. नाशिक जिल्ह्यात एकूण 15 तालुके असून आजमितीस 6 तालुक्यातील 236 गावे आणि वाड्यांना 58 टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतोय. पाऊस लांबल्यास आणखी परिस्थिती भीषण होण्याची चिन्ह असून दुष्काळ लागू करण्याची मागणी बळीराजा करु लागला आहे. वरुणराजाने आता सर्वांची परीक्षा थांबवावी आणि लवकरात लवकर कृपादृष्टी दाखवावी, अशीच प्रार्थना शेतकऱ्यांकडून देवाकडे करण्यात येत आहे.
इतर महत्वाची बातमी :