नाशिक : नाशिक एज्युकेशन सोसायटीचे (Nashik Education Society) अध्यक्ष प्राध्यापक सूर्यकांत रहाळकर यांचे आज दुपारी वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बीएससी, एलएलबी, एमबीए, बीसीजेचे त्यांनी शिक्षण घेतले होते. नुकतीच शताब्दी पूर्ण करत असलेल्या नाशिक (Nashik) एज्युकेशन संस्थेच्या वाटचालीत रहाळकर सर यांचे मोलाचे योगदान आहे, अभिनव भारत संस्थेचे ते विश्वस्त होते तसेच स्काऊट गाईड राज्य उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम बघितले होते.
नाशिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर (Suryakant Rahalakar) यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी दीड वाजता त्यांचे निधन झाल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नाशिक शिक्षण संस्थेच्या कामात रहाळकर यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. 1923 मध्ये स्थापन झालेली नाशिक शिक्षण संस्था ही शहरातील प्रमुख शैक्षणिक संस्थांपैकी एक मानली जाते. संस्थेच्या विविध शाळांमध्ये जवळपास 25 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. काही वर्षांपासून या संस्थेची जबाबदारी रहाळकर सांभाळत होते. अलीकडेच संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त नानाविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी त्यांनी विविध संकल्पना मांडून पुढाकार घेतला होता. दरम्यान प्रा. रहाळकर यांच्या निधनाची माहिती समजताच संस्थेच्या सर्व शाळा मधल्या सुट्टीनंतर सोडून देण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
रहाळकर यांनी प्राध्यापक म्हणून नाशिक येथील बीवायके (BYK Collage) महाविद्यालयात अनेक विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याचे काम केले होते. तद्नंतर नाशिक एज्युकेशन सोसायटीचे 1999 पासून आजतागायत त्यांनी या संस्थेचे अध्यक्षपद सरांनी भूषविले. या अर्थाने जवळपास चाळीस वर्षे संस्थेचे नेतृत्व ते करीत होते. संस्थेच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या विकासासाठी अनेकविध योजना सरांच्या मार्गदर्शनाने राबविल्या गेल्या. आपली संस्था बहुजनांना शिक्षण देण्यासाठी स्थापन केलेली आहे, असे रहाळकर नेहमी सांगत. समाजातील गरीब लोकांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे.यासाठी ते प्रयत्नशील होते.शाळांच्या गुणात्मक विकासासाठी मार्गदर्शकाची उत्तम भूमिका सर निभावत होते. संस्थेमध्ये कार्यरत शिक्षक, कर्मचारी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे व कौटुंबिक संबंध होते.
नाशिक शहरातील समाजकारण, राजकारण, शिक्षणक्षेत्रात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. अनुभव, अभ्यासू, तल्लख बुद्धी, अचूक निष्कर्ष आणि भविष्याचा नेमका वेध घेण्याची क्षमता त्यांच्यात असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे मार्गदर्शक म्हणून त्यांची ख्याती आहे. नोकरी, त्यानंतर विविध पदांची जबाबदारी सांभाळून पारंपरिक व्यवसाय देखील रहाळकर सांभाळत होते. समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार अशा अनेक प्रकारच्या क्षेत्रातील विविध पदांची जबाबदारी पेलत असतानांच ही एक प्रकारची समाजसेवा असल्याचे ते नेहमीच सांगत.आज सायंकाळी सात वाजता पंचवटी अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
छगन भुजबळांकडून श्रद्धांजली
प्रा. सूर्यकांत रहाळकर यांच्या निधनाने नाशिककरांनी दुःख व्यक्त केले आहे. अनेक विद्यार्थी त्यांच्या हातून घडलेले आहेत. त्या विद्यार्थी देखील श्रद्धांजली व्यक्त करत आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे. नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. नुकतीच शताब्दी पूर्ण करत असलेल्या या संस्थेच्या वाटचालीत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. प्रा. रहाळकर यांच्या निधनाने नाशिकच्या शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी श्रद्धांजली वाहिली आहे.
इतर महत्वाची बातमी :