Mohammed Siraj Team India: मोहम्मद सिराज याने आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये आग ओकणारी गोलंदाजी केली. सिराजने सहा विकेट घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला. आज सिराज भारतीय संघाचा आघाडीचा गोलंदाज आहे. पण इथंपर्यंतचा त्याचा प्रवास सोप्पा नव्हता. सिराजला पदार्पणात दणकून मार बसला होता. महागडी गोलंदाजी केल्यामुळे त्याच्यार टीकाही झाली होती. संघातून डच्चू मिळण्याची शक्यता होती. पण सिराज याने स्वत: च्या गोलंदाजीवर आणखी मेहनत घेतली. त्याच्यावर तत्कालीन कर्णधार विराट कोहलीने विश्वास दाखवला.. त्यासोबत सिरजाने मेहनतही केली. त्यामुळे आज सिराज भारताचा आघाडीचा गोलंदाज आहे. 



2019 मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिराजचा संघात समावेश करण्यात आला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना अॅडलेडमध्ये खेळला गेला. सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. पण सिराजला पदार्पणात दमदार कामगिरी करता आली नाही. सिराजने गोलंदाजीत धावांची लयलुट केली. सिराजने दहा षटकात तब्बल ७६ धावा खर्च केल्या होत्या. त्याला एकही विकेट मिळाली नव्हती.  या खराब कामगिरीमुळे सिराजला पुन्हा वनडेत संधी मिळण्यासाठी दोन वर्ष वाट पाहावी लागली. सिराजला २०२२ मध्ये वनडेमध्ये संधी मिळाली. 


पदार्पणात खराब कामगिरीमुळे संघाबाहेर गेलेल्या मोहम्मद सिराजला २०२२ मध्ये पुन्हा एकदा वनडे संघात स्थान मिळाले.  त्याआधी  2020 मध्ये त्याने कसोटीत पदार्पण केले होते. कसोटी पदार्पणात सिराजने पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. पण वनडे त्याला छाप सोडता आली नव्हती. 2019 पर्यंतचा काळ सिराजसाठी खूप आव्हानात्मक होता. देशांतर्गत सामन्यांमध्ये तो चांगली कामगिरी करत होता. भारतीय संघ व्यवस्थापनानेही सिराजवर विश्वास व्यक्त केला. याचा फायदा त्याला झाला.


आशिया कप 2023 मध्ये दमदार कामगिरी करत सिराजने पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याने आतापर्यंत 29 एकदिवसीय सामने खेळले असून या कालावधीत त्याने 53 बळी घेतले आहेत. सिराजने 21 कसोटी सामन्यात 59 विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्माचाही सिराजवर विश्वास आहे. सध्या तो टीम इंडियाच्या गोलंदाजीचा एक मजबूत भाग बनला आहे.