नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यात दोन महिन्यानंतर दोन दिवस पावसाने (Nashik Rain) जोरदार बॅटिंग केली खरी मात्र पुन्हा एकदा जैसे थे परिस्थिती अनुभवयास मिळत आहे. मागील आठवड्यात सोमवारी जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा 59 टक्के पाणीसाठा होता. मात्र त्यानंतर गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी रात्रीपर्यंत जोरदार बरसलेल्या पावसामुळे धरणाची (Gangapur Dam) ओंजळ भरली आहे. मात्र पुन्हा एकदा पावसाने दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे.
मागील आठवड्यात नाशिक शहरासह जिल्ह्यात (Nashik District) सर्वदूर झालेल्या पावसाने सर्वांना मोठा दिलासा मिळाला. मात्र शनिवारनंतर पुन्हा एकदा लख्ख ऊन पडू लागले असून खरिपाचा हंगाम वाया जाण्याची भीती आहे. एकीकडे दोन दिवस झालेल्या पावसाने कुठेतरी पिकांना दिलासा मिळाला होता, मात्र परत सूर्यदर्शन होऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दोन दिवसांच्या पावसाने नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये एकूण उपयुक्त जलसाठा 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सद्यस्थितीत 95 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे नाशिककरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिकांना जीवदान मिळेल का? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
राज्यात अद्यापही पुरेसा पाऊस नसल्याने खरीप हंगाम (Kharip season) पूर्णपणे धोक्यात आल्याचे चित्र दिसू लागले आहे. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, तेथेही उत्पादकता 50 टक्क्यांनी घटल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यातही अनेक पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. नाशिक विभागात खरीप हंगामातील 80 टक्के मका, सोयाबीन, 40 टक्के कापूस, मूग, उडीद ही पीक पावसाअभावी वाया गेल्यात जमा आहे. त्यामुळे अजूनही जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अनेक शेतकरी विहिरीतून, टँकरद्वारे पाणी भरून पिकांना जागवत आहेत. तर काही ठिकाणी खरिपाचा हंगाम पूर्णतः वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी शेतकऱ्यांनी रब्बीवर लक्ष केंद्रित केले असून मात्र त्यासाठी सलग पंधरा दिवस पावसाची आवश्यकता आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत दमदार पाऊस पडला तरच रब्बी पिके टॅग धरू शकणार आहेत.
अजूनही अनेक गावांना टँकरद्वारे पाणी
गेल्या दोन-चार दिवसात झालेल्या पावसाने सर्वत्र नदी नाले ओढे भरून वाहत असताना अचानक पावसाने दडी मारली. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांना अजूनही टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. मनमाड, नांदगावमधील धरणे अजूनही कोरडे ठाक असून परिसरातील नागरिकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. येवला तालुक्यातील अनेक गावांची तहान टँकरवर भागवली जात आहे. नांदगाव तालुक्यातील रिमझिम पाऊस झाल्याने पाणी टंचाईचे संकट गडद झाले आहे. मनमाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणारे तळ गाठला असून पाऊस न झाल्याने मनमाडकर तहानलेलेच आहेत. ऐन पावसाळ्यात शहराला अठरा ते वीस दिवसांनी आठ पाणीपुरवठा होत आहे. तर नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज आणि नागासाक्या ही दोन धरणे अजूनही शून्यावर आहेत.
असा आहे जलसाठा
नाशिक शहराची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणाचा जलसाठा वाढू लागल्याने नाशिककरांचा पाणीप्रश्न मिटला आहे. आजपर्यंत गंगापूर धरणात फक्त 95 टक्के पाणीसाठा सध्या आहे. कश्यपी धरणात 81 टक्के, गौतमी धरणात 78 टक्के, पालखेड धरण 97 टक्के, गिरणा 53 टक्के, पुणेगाव धरणात 94 टक्के पाणीसाठा आहे. तर दारणा धरणामध्ये 97 आणि भावली 100 टक्के एवढा पाणीसाठा आहे, वालदेवी 100 टक्के, नांदूरमध्यमेश्वर 99 टक्के, हरणबारी 100 टक्के, केळझर 100 नागासाक्या, माणिकपुंज 0 टक्के असा धरणसाठा उपलब्ध आहे.
इतर महत्वाची बातमी :