नाशिक : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हा पुरता हतबल झाला आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ. यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचत चालला आहे. कोणतेही पिक घेतले तरीही ते पावसाच्या अनियमिततेमुळे वाया जात आहे. त्यामुळे शेतकरी हळूहळू पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक शेतीकडे वळू लागला आहे. निसर्गाच्या लहरीपणावर पणावर मत करत नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला (Yeola) येथील शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रुटचा मळा फुलवला आहे. ड्रॅगन फ्रूटची शेती कमी पाण्यात होत असल्याने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसमोर ड्रॅगन फ्रुट शेतीचा पर्याय उभा केला आहे.


ड्रॅगन फ्रुट (Dragon fruit) म्हटलं की आजही परदेशातून भारतात आलेलं फळ म्हटलं जात. मात्र हल्ली देशभरातील शेतकरी ड्रॅगन फ्रुटच्या शेतीकडे (Farming) वळताना दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील ममदापूर (Mamdapur) येथील शेतकरी रामराव गिडगे Ramrao Gidge) यांनी आधुनिकतेची कास धरत ड्रॅगन फ्रुट शेतीला आपलस केले आहे. ड्रॅगन फ्रुट शेतीची कणभरही माहिती नसल्याने रामराव यांना आपल्या नातेवाईकांसह गुगल आणि युट्युबचा चांगलाच हातभार लागल्याचे सांगतात. रामराव यांनी कमी पाण्यावर आधारित आणि प्रसंगी दुष्काळातही तग धरू शकेल, अशा पिकांचा अभ्यास सुरू केला होता. त्यात त्यांना बहुपयोगी 'ड्रॅगन फ्रूट'ची माहिती मिळाली. विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यानंतर त्यांनी चाचणी म्हणून अर्धा एकर शेतीत म्हणून लागवड केली. लागवडीनंतर एक वर्षाला फळधारणा सुरू होते व वीस पंचवीस वर्षे उत्पन्न घेता येते. त्या दृष्टीने रामराव यांनी ड्रॅगन फ्रूटच्या शेती साठी स्वतःला झोकून काम सुरु केले आहे. 


कोळपेवाडी साखर कारखान्याततुन निवृत्ती घेतलेले रामराव गिडगे यांची ममदापुरमध्ये 22 एकर शेती असून या परिसरात ज्वारी, मका, कापूस, उन्हाळ कांदा आदीसंह विविध पिके घेत असतात. शेतजवळच विहिरींसह शेततळे देखील आहे. मात्र अनेकदा या भागात पाऊस साथ देत नसल्याने विहीर आणि शेततळे तळ गाठत असते. त्यामुळे अनेकदा पिकांना पाणी देणे मुश्किल होऊन बसते. त्यामुळेच गिडगे यांनी ड्रॅगन फ्रूटची माहिती नातेवाईकांकडून मिळवली. याचबरोबर गुगल, युट्युबची देखील मदत घेतली. त्यावरून ड्रॅगन फ्रुटच्या शेतीसाठी पाणी कमी आणि पोषक वातावरण लागत असल्याने दोन्हीची उपलब्धता होती. त्यानुसार त्यांनी यंदा अर्धा एकरवर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. यासाठी जवळपास 20 रुपयास एक ड्रगन फ्रूटची कांडी अशा एकूण 1050 कांड्या खरेदी केल्या. आतापर्यत गिडगे यांना पावणे दोन लाख रुपयांचा खर्च आला असून जुलैमध्ये लागवड केली असल्याने आता अठरा महिन्यापर्यंत फळ येणार आहे. त्यानंतर फळ येण्यास सुरवात झाल्यानंतर दर 45 दिवसांनी फळ येईल अशी माहिती गिडगे यांनी दिली. 


दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी... 


नाशिक जिल्ह्यात हळूहळू ड्रगन फ्रुट शेतीकडे शेतकरी वळू लागला आहे. गिडगे यांनी देखील पारंपरिक शेतीला फाटा देत वेगळा प्रयोग करत इतर शेतकऱ्यांनाही अपारंपरिक पिके घेण्याची प्रेरणा घेतली. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आजवर शेतीत नवनवीन प्रयोग करत सफरचंद, केसर आंबा, स्ट्रॉबेरी, रेशीम अशी वेगवेगळी उत्पादने घेतली आहेत. ड्रॅगन फ्रुट हे हलक्या प्रतीच्या जमिनीतसुद्धा चांगले येते. ड्रॅगन फ्रुट हे अमेरिकेतील वाळवंटी भागात आढळते. हे फळ बाहेरुन गुलाबी रंगाचे असते. तर आत पांढरा गर असतो. विशेष म्हणजे ड्रॅगन फ्रुट हे फळ अनेक आजारांवर तसेच, त्वचेसाठी गुणकारी आहे. दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ड्रॅगन फ्रूटची बाग फुलवण्याचा निर्णय घेतल्याचे गिडगे यांनी सांगितले.



ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीची पद्धत


सर्वप्रथम एक एकर शेतजमीन मशागतीने भुसभुशीत करण्यात येते. लागवडीसाठी 9 बाय 9 या अंतरावर जमिनीत खड्डे तयार करून त्यावर चार फुट उंचीचे सिमेंट खांब उभे करण्यात येतात. ड्रॅगन फ्रुटवर वाफे तयार करण्यात आले. प्रत्येक सिमेंट खांबाच्या आजूबाजूला 4 रोपट्यांची लागवड करण्यात आली होती. एका एकरच्या लागवडीसाठी तीन लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे शेतकरी सांगतात. ड्रॅगन फळाच्या झाडाची वयोमर्यादा ही 20 ते 22 वर्ष असल्याने अनेक दिवस यापासून मोठे उत्पादन शेतकऱ्याला मिळणार आहे.


इतर महत्वाची बातमी : 


Dragon Fruit : सातपुड्याच्या पायथ्याशी 'ड्रॅगन फ्रूट'चा मळा, आत्तापर्यंत 15 लाखांचं उत्पन्न, आदिवासी भागातल्या शेतकऱ्यांसमोर नवीन पर्याय