नाशिक : राज्य शासन अतिशय नियोजनबद्धरित्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध पदभरतीच्या परीक्षा घेत आहे. कुठलाही गैरप्रकार करण्यास वाव नसून परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना सुद्धा दक्ष राहण्याचे निर्देश आहेत, त्यामुळेच नाशिक (Nashik) येथे परीक्षा केंद्रावर तलाठी पदाच्या ऑनलाईन परीक्षेच्यावेळी तीन संशयितांना पकडण्यात यश आले. या परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, याविषयी कुणीही संभ्रम निर्माण करू नये व अफवाही पसरवू नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले आहे.


नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या (Mhasrul Police) हद्दीत काल परीक्षा केंद्रावरून पोलिसांनी तीन संशयितांना पकडले आणि त्यांच्याकडून टॅब, वॉकी टॉकी, मोबाईल फोन, हेडफोन असे साहित्य जप्त केले आहे. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडीही देण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत पारदर्शी आणि शिस्तबद्धरित्या पदभरतीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. पूर्वीच्या काळात अशा स्पर्धा परीक्षांत काही गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. सदोष भरती प्रक्रियेमुळं विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. आणि म्हणूनच राज्य शासनाने टीसीएस आणि आयबीपीएस (TCS, IBPS) या कंपन्यांकडून या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि या संस्था काटेकोरपणे या परीक्षा घेतील. राज्य शासनाचे सर्व प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष आहे असेही मुख्यमंत्री म्हणतात.



बहुचर्चित तलाठी परीक्षेच्या (Talathi Exam) पहिल्याच दिवशी नाशिकसह नागपूरमध्ये गैरप्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. नाशिकमध्ये तर हायटेक कॉपीचा प्रकार समोर आला. आरोपीकडे  एक टॅब, एक वॉकी टॉकी, दोन मोबाईल फोन आणि हेडफोन असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेचे फोटोही मिळून येताच म्हसरूळ पोलीस ठाण्यात गणेश गुसिंगेसह सचिन नायमाने आणि संगीता गुसिंगे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे संबंधित आरोपी यापूर्वी देखिल परीक्षेत गैरप्रकार केल्याच्या एका गुन्ह्यात फरार असल्याच पोलीस तपासात दिसून आल्याने राज्यात अशाप्रकारे काम करणारे एखादे रॅकेटच कार्यरत आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.  


संशयित गणेश नुसिंगे कोण? 


तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार प्रकरणी नाशकात अटक करण्यात आलेला आरोपी गणेश नुसिंगे (Ganesh Nusinge) हा म्हाडा आणि पिंपरी चिंचवड पोलीस भरती घोटाळ्यात फरार असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात म्हाडा परीक्षा भरती मध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी खेरवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे तर पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2019मध्ये गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर याच गुसिंगेवर 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांसाठी हा फरार आरोपी असताना एवढे दिवस या आरोपीला अटक करण्यास कसे लागले? असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित केला आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये गैरप्रकार आणि हायटेक कॉपी करण्यामध्ये एक टोळीच कार्यरत असल्याचा संशय समितीला असून यामध्ये गणेश घुसिंगे आणि त्याचे साथीदार असल्याचा आरोप संघटने कडून केला जातो आहे. 


 


इतर महत्वाची बातमी : 


Nashik Rohit Pawar : 'तो' दोन वर्षांपासून फरार, सरकारमधील एखादा नेताच पेपरफुटीमागे आहे का? आमदार रोहित पवारांचा सवाल