Nashik Latest Marathi News Update: 'चालला गजर, लागली नजर कळसाला, पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला' अशी साद घालत यंदा लाखो वारकरी संत निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर येणार आहेत. दोन वर्षांनंतर वारकरी निवृत्तीनाथ भेटीचा सोहळा पार पडणार असून यासाठी त्र्यंबकेश्वर प्रशासन आणि निवृत्तीनाथ मंदिर प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. 


वारकऱ्यांमध्ये विशेष महत्त्व असलेली संत निवृत्तीनाथ यात्रा अवघ्या काही दिवसांवर आली असून त्र्यंबकेश्वर देवस्थानकडून जय्यत तयारी सुरू आहे. यंदा 500 हुन अधिक दिंड्या, तर 3 लाखांहून अधिक वारकरी त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल होणार आहेत. संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानच्या वतीने यात्रेचे नियोजन अंतिम टप्प्यात असून यात्रा सुरू होण्यापूर्वीच संत निवृत्तीनाथ मंदिर परिसरात कृत्रिम सभा मंडप, कृत्रिम दर्शन बारीचे उभारणी आली आहे. त्याचबरोबर यंदाची वारी निर्मल वारी होण्यासाठी प्रशासनासह देवस्थान प्रशासन प्रयत्न करत आहेत.


येत्या 16 ते 20 जानेवारी दरम्यान त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ  महाराज यात्रोत्सव होणार आहे. सध्या मंदिराच्या जिर्णोधाराचे काम सुरू आहे. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या प्रसाद योजनेअंतर्गत मंदिर परिसरात कामे सुरू आहेत. यात्रा काळात राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी त्र्यंबक नगरीत दाखल होतात. त्यांची कुठलीही गैर्य होऊ नये, यासाठी देवस्थानच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. मंदिर परिसरातील मुख्य सभागृह सभा मंडप पाडण्यात आले असल्याने या ठिकाणी कृत्रिम सभामंडप तयार करण्यात येत आहे. त्याचबरोबर मुख्य सभामंडप बाजूलाच कृत्रिम दर्शन बारीची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच वारकऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी दर्शन बारी वरही मंडप उभारण्यात येणार आहे. 


त्याचबरोबर उत्सव काळात देवस्थान परिसराला आकर्षक सजावट करण्यात येणार असून लाल गालीचा वापर करण्यात येणार आहे. संत निवृत्तीनाथ यात्रा निर्मल वारीसारखी व्हावी यासाठी देवस्थानच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाकडून उत्सव काळात गर्दी होऊ नये यासाठी दुभाजक मागून मंदिर परिसर बंदिस्त करण्यात आला आहे.  मानाच्या दिंड्यांसाठी राहुट्यांची व्यवस्था करण्यात येणार असून श्रीफळ प्रसाद देऊन त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष निलेश तुकाराम गाढवे यांनी दिली.


ठिकठिकाणी 30 हुन अधिक सिसिटीव्ही...
यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मानाचे दिंड्या येतात. त्यामुळे वारकऱ्यांची गर्दी होणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही उभारण्यात येणार आहेत. तसेच त्र्यंबकेश्वर दाखल होणाऱ्या दिंड्याचे सभामंडपात स्वागत करत त्यांच्या निवासासाठी राहुट्या उभारण्यात येणार असल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.