Nandurbar News : एकीकडे राज्यात समृद्धी महामार्ग (Samrudhhi Highway) आणि अनेक विकासाच्या मॉडेलच्या गप्पा होत आहेत. मात्र दुसरीकडे आजही सातपुड्याच्या दुर्गम भागात राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मतदार असलेल्या मनीबेलीच्या (Manibeli village ) पदरी आजही उपेक्षाच वाट्याला येत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. 


राज्यातले पहिल गाव म्हणून नंदुरबारच्या (Nandurbar) मणिबेलीची ओळख, याच मणिबेलीतून राज्यातील पहिले मतदान बूथ सुरु होते. याच गावात राज्यातला पहिला मतदार वास्तव्य करतो. मात्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी (Amrut Mahotsavi Year) वर्षांनंतरही या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने गावकऱ्यांना आजही मरण यातना भोगाव्या लागत आहे. रस्ताच नाही, त्यामुळे विकासगंगा पोहचली नसल्याने लाईट, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा साऱ्याच समस्या येथील नागरीकांना भेडसावत असुन याबाबत कधी उपयायोजना होणार असा प्रश्न या ठिकाणचे स्थानिक करत आहेत. कोट्यवधी रुपयांची उधळण करणाऱ्या मायबाप शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज या भागातील नागरिक व्यक्त करत आहे.


वरसन बिज्या वसावे राज्यातील पहिल्या क्रमांकाचे मतदार


नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा (Akkalkuwa) तालुक्यातील मणिबेली हे गावातील वरसन बिज्या वसावे (Varsan Bijya Vasave) हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मतदार राहतो. 2019 च्या विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीत राज्यातील प्रथम क्रमांकाच्या अक्कलकुवा मतदरसंघातील सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील मणिबेली गावाचे रहिवासी वरसन वसावे हे प्रथम मतदार होते. मनिबेली गाव सरदार सरोवर प्रकल्पामुळे बुडितात जाणारे पहिले गाव होते. मात्र आजही या गावाची अवस्था बकाल स्वरूपात असून त्या गावापर्यंत जाण्यासाठी धड रस्ता नसल्याने रस्ते आणि विकास फक्त शहरी भागासाठी का असा प्रश्न उपस्थित होत आहे. धडगाव तालुक्यातील मनीबेलीला रस्ता कधी मिळणार? हे गाव कधी विकासाचा मुख्य प्रवाहात येणार? असा प्रश्न आता गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 


एकीकडे राज्यात हजारो कोटी रुपये खर्चून मोठं मोठे महामार्ग उभारले जात आहेत. यात समृद्धी महामार्गासारखा महत्वाचा प्रकल्प मात्र नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातील अनेक गावांना आज पायाभूत सुविधांची वाणवा आहे. यामध्ये राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मतदार असलेल्या मणिबेली गाव देखील समाविष्ट आहे. मणिबेली प्रमाणेच राज्यातील अनेक गावांमध्ये हीच परिस्थिती असून साधा ऍम्ब्युलन्स जाण्या इतपत रस्ता नसणे ही खरंतर लाजिरवाणी गोष्ट असल्याचे दिसून येत आहे. यासाठी तातडीने स्थानिक प्रशासनाव लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.