Nashik Crime News नाशिक : गर्दीचा फायदा घेत शहरातील बसस्थानकांवर प्रवाशांच्या बॅगेतून दागिने चोरणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या (Mumbai Naka Police Station) अधिकाऱ्यांना यश आले आहे. या प्रकरणी चार तरुणींना अटक करण्यात आली आहे. यात दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. या संशयित तरुणी जालना, संभाजीनगर परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस (Police) तपासात आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संजना रोहन शिंदे (19, रा. मिटमिटा झोपडपट्टी, संभाजीनगर), फरिना जय सोनवणे (19, रा. वजीरखेडा, भोकरदन ता. जि. जालना) अशी संशयित तरुणींची नावे आहेत. त्यांच्यासह बोईसर आणि पंचवटीतील 15 वर्षींय मुलींनाही पोलिसांनी अटक केली आहे.
महामार्ग बसस्थानकातून लांबवली सोन्याची पोत
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिता राजेंद्र पाटील (50, रा. होळ, ता. शिंदखेडा जि. धुळे) या गेल्या गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास महामार्ग बसस्थानकातून (Mahamarg Bus Stand) कसारा-नाशिक बसमध्ये चढत असताना, गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या पोत संशयितांनी लांबवली. काही मिनिटांत ही बाब त्यांच्या लक्षात आली.
चार तरुणींना पोलिसांनी घेतले ताब्यात
त्यांनी आरडाओरड करुन घटनेची माहिती सर्वांना दिली. यानंतर मुंबई नाका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बसस्थानकासह उभ्या असलेल्या बसेसमध्ये संशयितांचा शोध सुरू केला. गुन्हेशोध पथकाचे हवालदार राजू टेमगर, अंमलदार सागर जाधव, राजेंद्र नाकोडे व महिला अंमलदारांनी काही मिनिटांत संशयावरुन बसस्थानकातूनच दोघींना ताब्यात घेतले. तेव्हा दोघींनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अंमलदार समाधान धीवर, महिला अंमलदार एम. व्ही. लांडगे यांनी उर्वरित दोघा अल्पवयीन मुलींना बसस्थानकाजवळून ताब्यात घेतले.
आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता
या चारही संशयित मुलींना मुंबई नाका पोलीस ठाण्यात आणून पोलिसांनी चौकशी केली. यात दोन तरुणींनी गर्दीचा फायदा घेत चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 15 हजार रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी जप्त केले. अल्पवयीन संशयित मुलींना नोटीस देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित दोघींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Dhule News : तोतया जीएसटी अधिकारी प्रकरणाची व्याप्ती वाढली, धक्कादायक माहिती समोर