Nashik Election 2026: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी (Municipal Election) निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील 29 महापालिकांमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तर नाशिक महानगरपालिका निवडणुकीत (Nashik NMC Election) भाजप (BJP) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेची (Shiv Sena) युती होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी मोठा दावा केलाय.
Ajay Boraste: नेमकं काय म्हणाले अजय बोरस्ते?
भाजपने युतीची चर्चा थांबवली, युतीच्या चर्चेबाबत भाजपने संवाद कमी केला, असा दावा शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी केलाय. युती करायची की नाही हे भाजपने स्पष्ट करावे. अन्यथा आम्ही स्वबळावर 122 जागा लढण्यासाठी तयार आहोत, असा इशारा देखील त्यांनी भाजपला दिला आहे. सुरुवातीला आम्ही 60 जागांची मागणी केली होती. त्यानंतर आम्ही 45 जागा घेण्याची तयारी दर्शविली. मात्र, आता भाजपकडून कोणताच प्रतिसाद नाही. आम्ही 45 पेक्षा एकही जागा कमी घेणार नाही. भाजप ने आपली भूमिका स्पष्ट करावी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती बाबतीत आम्हाला माहिती नाही. शिवसेना-भाजप ही नैसर्गिक युती आहे. याबाबत भाजपने आधी बोलावे, असे देखील अजय बोरस्ते यांनी म्हटले आहे. आता नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Nashik Election 2026: नाशिकमध्ये मनसे-ठाकरेंची शिवसेना एकत्र निवडणूक लढणार
दरम्यान, नाशिक महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत. लवकरच नाशिकमधील मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची घोषणा होणार आहे. नाशिकमध्ये मनसेच्या कार्यालयात सोमवारी मनसे पदाधिकारी आणि ठाकरे यांच्या शिवसेनेची बैठक पार पडली. नाशिक महानगरपालिकेच्या जागा वाटपा संदर्भात ही बैठक झाली. यावेळी ठाकरेंच्या सेनेचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी व मनसेचे नेते दिनकर पाटील हे उपस्थित होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या