Nashik Accident : नाशिकच्या उड्डाणपुलावर द्वारका परिसरात रविवारी रात्री भीषण (Nashik Accident News) अपघात झाला. निफाड तालुक्यातील धारणगाव येथे देवाचे कारण या कार्यक्रमासाठी सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील तरुण गेले होते. या कार्यक्रमावरून परतत असताना उड्डाणपुलावर या मुलांना घेऊन जात असलेला टेम्पो एका ट्रकला जोरात धडकला. त्यामुळे ट्रकमध्ये असलेल्या लोखंडी सळ्या पिकअप ट्रकच्या काचा फोडून मागच्या भागात शिरल्या. या लोखंडी सळ्या थेट मागच्या भागात असलेल्या मुलांच्या अंगात शिरल्याने यांच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव झाला. या भीषण अपघातात पाच तरुणांचा मृत्यू झालाय. तर 13 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी जखमींच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भीषण अपघातानंतर गिरीश महाजन यांनी मोठा निर्णय घेतलाय.
पोलीस आणि आरटीओ विभागाची तातडीची बैठक
नाशिकमध्ये गिरीश महाजन यांनी पोलीस आणि आरटीओ विभागाची तातडीची बैठक बोलवली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आरटीओ विभागातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नाशिकच्या उड्डाणपुलावर रात्री झालेल्या अपघातप्रकरणी चर्चा केली जाणार आहे. अपघातात वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झाले आहे. त्यामुळे वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी आणि कारवाई करण्यासंदर्भात गिरीश महाजन पोलीस आणि आरटीओ विभागातील अधिकाऱ्यांची चर्चा होणार आहे. या बैठकीनंतर काय उपाययोजना केल्या जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत
दरम्यान, या भीषण अपघातातील जखमींची विचारपूस करण्यासाठी मंत्री गिरीष महाजन यांनी कल्पतरू खाजगी रुग्णालयात भेट दिली आहे. तर मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची शासकीय मदत देणार असल्याची घोषणा ही मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच अनेक अपघातात नियमांचे पालन होत नाही. गाड्यांना टेललॅम्प, रेडियम आदी अत्यावश्यक गोष्टीही नसतात. त्यामुळे या संदर्भात गंभीर दखल घेऊन कडक कारवाई केली जावी, असे गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे.
आणखी वाचा