नाशिक : शहरात जून महिन्यात डेंग्यूने (Dengue) कहर केला असून, तब्बल 161 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. केंद्राच्या मलेरिया विभाग समितीने याबाबत गंभीर दखल घेत या समितीने नाशिक (Nashik News) गाठत डेंग्यूचा आढावा घेतला आहे. केंद्रीय समितीने महापालिकेच्या (Nashik NMC) मलेरिया विभागाला लवकरात लवकर डेंग्यूला अटकाव घालण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांसह इतरही विभागांना डेंग्यूबाबत सहभागी करून घेण्यात यावे, याबाबतही अवगत करण्यात आले. दरम्यान, डेंग्यूने शहरात हातपाय पसरल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.


शहर डेंग्यूचे हॉटस्पॉट बनत असल्याने केंद्रीय मलेरिया विभागाच्या समितीतील महाराष्ट्र-गोवा व दीव दमन विभागाच्या प्रमुख डॉ. सरिता सकपाळ यांच्यासह डॉ. अलोने, कीटकशास्रज्ञ माने आदींनी बुधवारी शहर गाठले. गुरुवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत शहरातील विविध भागात जाऊन त्यांनी पाहणी केली व मलेरिया विभागाला सूचना दिल्या. 


केंद्रीय पथकाला आढळल्या डेंग्यूच्या अळ्या 


नागरिकांनी अडगळीला पडलेले भंगार, रिकामे टायर, बाटल्या यामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. बांधकाम व्यावसायिकांना कडक सूचना देऊन डास उत्पत्ती केंद्र निर्माण होणार नाही याबाबत लक्ष देण्यास सांगितले. गेल्या वर्षीपेक्षा यंदा शहरात डेंग्यूने डंख मारला असून, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभाग हतबल झाला असून, उपाययोजना सुरू आहे. तर पाहणीदरम्यान केंद्रीय पथकाला डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. 


नाशिक डेंजर झोनमध्ये


आतापर्यंत तब्बल पंचवीस हजार डास उत्पत्ती केंद्रे आढळून आली असून, ती नष्ट केली जात आहेत. गतवर्षी जानेवारी ते जूनदरम्यान १३० रुग्ण होते. मात्र, चालू वर्षात हीच आकडेवारी 269 पर्यंत गेली आहे. डेंग्यूवर प्रतिबंध घालण्यासाठी मलेरिया विभागाकडून धूर फवारणीसह डास उत्पत्ती स्थाने शोधून नष्ट केली जात आहेत. डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांना नोटिसा दिल्या जात आहे. तर, नाशिक डेंजर झोनमध्ये असल्याने मनपाच्या औषध आणि धूर फवारणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. 


डेंग्यू रुग्णाची संख्या अडीचशे पार


पावसाळ्याच्या पाण्यामुळे परिसरातील नाल्यांमध्ये, कचऱ्याच्ऱ्या ढिगाऱ्यात डासांचे अड्डे तयार होत आहेत. शहरात अद्याप पावसाने दमदार हजेरी लावलेली नसली तरी डेंग्यू रुग्णाची संख्या अडीचशे पारवर पोचली आहे. दरम्यान, केंद्राच्या मलेरिया विभागाच्या समितीकडून शहरात पाहणी केल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात राहील का हे पाहावे लागणार आहे.


गोविंदनगरमध्ये डेंग्यूसदृश रुग्णाचा मृत्यू


दरम्यान, शहरातील गोविंदनगर भागातील डेंग्यूसदृश रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून, काही दिवसांपूर्वीच या परिसरात डेंग्यू सदृशाने रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर सिडकोतील अश्विननगर भागातीलही रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. नागरिकांना लक्षणे दिसताच रुग्णालयात जाऊन तपासणी करण्याचे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाने केले आहे.


डेंग्यूचा कहर


महिना       बाधित रुग्ण


जानेवारी        २२


फेब्रुवारी         ५


मार्च              २७


एप्रिल            १७


मे                 ३९


जून              १६१