Nylon Manja नाशिक : सर्वत्र मकर संक्रांत (Makar Sankrant) सणानिमित्ताने पंतग (Kite) उडविण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. परंतु, पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपारिक मांजाऐवजी नायलॉन (Nylon Manja) तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या प्रतिबंधित मांजाची विक्री काही जणांकडून केली जात असल्याचे आढळून आले आहे. अशांवर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) कारवाईचा बडगा उगारला असून शहरात अवैध नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या 42 जणांविरोधात हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
पतंगाच्या मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास धोका निर्माण होतो. पक्षी, प्राणी, नागरीक, बालके, वयोवृद्ध, वाहनस्वार जखमी होण्याचे अथवा प्राण गमाविण्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. तुटलेला मांजा विजेच्या तांरामध्ये अडकून काही ठिकाणी आगी देखील लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून दि. 23 जानेवारीपर्यंत नायलॉन मांजा (Nylon Manja) विक्री व वापरावर मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
४२ जणांवर हद्दपारीची कारवाई
त्याअनुषंगाने नाशिक पोलिसांनी पंचवटी, सरकारवाडा, अंबड व नाशिकरोड विभागातील नायलॉन तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मांजा विक्री करणाऱ्या एकूण 42 जणांवर हद्दपरीची कारवाई केली आहे. आडगाव परिसरात 3, म्हसरूळ 2, पंचवटी, 2, भद्रकाली 5, सरकारवाडा 8, गंगापूर 5, मुंबईनाका 5,सातपूर 1, अंबड 2, इंदिरानगर 3, उपनगर 3, नाशिकरोड 2, देवळाली कॅम्प 1, अशा एकूण 42 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
70 नायलॉन मांजाचे गट्टू जप्त
नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या संशयितास अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) गुन्हे शोध पथकाने नुकतेच ताब्यात घेतले. त्याच्याकडून 28 हजार रुपये किमतीचे 70 नायलॉन मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले आहेत. अमृतेश्वर महादेव मंदिराजवळ केवलपार्करोड, या ठिकाणी एक व्यक्ती गोणीमधून संशयित नायलॉन मांजाची (Nylon Manja) विक्री करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी संशयितास सप्ला रचून अटक केली आहे.
नाशिक पोलिसांचा इशारा
नायलॉन मांजा विक्री व वापरावर दि. 23 जानेवारीपर्यंत नाशिक पोलिसांनी (Nashik Police) मनाई केली आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार आहे. तसेच गुन्हा दाखल केल्यानंतरही मांजाचा वापर व विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितास तडीपार, हद्दपार व इतर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Crime News : नाशकात घरफोड्यांचे सत्र संपेना! चार घटनांमध्ये सात लाख लंपास
Nashik Police : नाशिक पोलिसांच्या कर्तव्याला सलाम! तब्बल तीन कोटींचा मुद्देमाल मालकांना केला परत