Nashik Crime News :  नाशिक जिल्ह्यात गुन्हेगारी (Crime) दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गुन्हेगारी रोखणे पोलिसांपुढे (Police) मोठे आव्हान असून ती रोखण्यासाठी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. ओझर-10 वा मैल परिसरात एकाला नाशिक ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे दोन पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. 


नववर्ष व 31 डिसेंबर 2023 च्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण परिक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रे विरोधी मोहिम हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मालेगाव शहरातून एका टॅक्सीमध्ये काही संशयित घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगून नाशिकच्या दिशेने येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.  


मिळालेल्या माहितीची आधारे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदरांनी ओझर- 10 वा मैल परिसरात सापळा रचून संशयित टॅक्सी ( क्र. एम. एच. 15. जी.व्ही. 2758) अडवली. वाहनातील संशयित मोहम्मद आरिफ मोहम्मद फारूख (36, रा. रजियाबाद, मालेगाव, ता. मालेगाव) याची झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या एका बॅगमध्ये देशी बनावटीचे दोन पिस्टल व चार जिवंत काडतूसे आढळली. त्यानंतर पोलिसांनी संशयितावर ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


यांनी बजावली कामगिरी


नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, विशेष पथकातील पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सहायक उपनिरीक्षक  दिपक आहिरे, शांताराम नाठे, अंमलदार सचिन धारणकर, चेतन संवत्सरकर, विनोद टिळे, गिरीष बागुल यांचे पथकाने ही कामगिरी केली.


पोलीस आयुक्तालयाकडून व्हॉट्सअ‍ॅप नंबर जारी


पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून शहरातील नागरिकांकडून अभिप्राय व सूचना जाणून घेण्यासाठी व्हॉटस्अ‍ॅप नंबर जारी करण्यात आला आहे. नाशिक शहर पोलिसांतर्फे शहरातील नागरिकांना आपले अभिप्राय व सूचना नोंदवता याव्यात, यासाठी पोलीस आयुक्त व्हॉट्सअ‍ॅप नंबर ९९२३३२३३११ सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सुरक्षित नाशिकसाठी नागरिकांनी अभिप्राय, सूचना तसेच प्रतिक्रिया मेसेजद्वारे या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर नोंदवू शकतात. 


 



आणखी वाचा


राम मंदिर उद्घाटनाचं राज ठाकरेंना निमंत्रण नाही, राज ठाकरेंची 'एबीपी माझा'ला माहिती


NO Mask NO Darshan : आजपासून शिर्डीत 'नो मास्क नो दर्शन'; पालकमंत्र्यांच्या मंदिर प्रशासनाला सूचना