Nashik Crime News: नाशिक शहरासह जिल्ह्यांत वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना पेव फुटले आहे. अशातच चोरीचे नवनवे प्रकार चोरांकडून अवलंबले जात असल्याचा प्रकार समोर येत आहेत. मालेगाव शहरातून चोरांनी चक्क शाळेच्या विद्यार्थ्यांची फी पळवल्याची घटना घडली.
नाशिक शहरात चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत असून जिल्ह्याच्या विविध भागांतही चोरी, लूटमार, दरोडा टाकण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. मालेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील हारून अन्सारी उर्दू प्रायमरी स्कुल जे. ए.टी. कॅम्पसमधून 16 लाखांची चोरी करण्यात आल्याची घटना घडली. येथील मुख्याध्यापक कार्यालयातील कपाटातील मुलांची शैक्षणिक व परिक्षा फी अशी मिळून एकूण 15 लाख 99 हजार 500 रुपये अशी रोख रक्कम अज्ञात चोरांनी पळवली. या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मालेगाव पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रिती सार्वजी यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून मालेगाव शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक स्थापन केले. गुन्हयातील संशयितांसह चोरीस गेले मालाचा शोध घेण्यास सुरूवात केली. सदरचा शोध घेत असताना उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव शहर तेघबीर सिंह संधू यांना गुप्त माहिती मिळाली. गुन्ह्यातील चोरी केलेल्या रोख रकमेसह संशयित हे मालेगाव मनमाड चौफुली उड्डाणपुलाखाली असल्याचे समजले. त्यानुसार तपास पथकाला त्वरीत माहिती देवून रवाना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
सदर तपास पथकाने मनमाड चौफुली उडडाणपुलाखाली जावून खात्री केली असता तपास पथकास काही व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. संबंधित मोहम्मद सुलेमान मोहम्मद सलीम उर्फ माने, मोहम्मद बिलाल शब्बीर अहमद, उर्फ बिल्ला, मोहम्मद आमीन निसार अहमद, उर्फ ताडे, अफताब अहमद अब्दुल अजीज उर्फ प्याराबार अशा संशयितांना ताब्यात घेण्यात आले.
संशयास्पद हालचाली आढळून आल्याने अंगझडती घेतली असता मोहम्मद आमीन निसार अहमद याच्या पाठीस लावलेल्या काळया बॅगमध्ये रक्कम 2 लाख 25 हजार रुपये मिळुन आले. तसेच अफताब अहमद अब्दुल अजीज याच्या पाठीस लावलेल्या निळया बॅगेत रक्कम 3 लाख 20 हजार रुपये व मोहम्मद बिलाल शब्बीर अहमद यांच्याकडून रक्कम 3 लाख 69 हजार रोख हस्तगत करण्यात आली आहे. सदर गुन्हयात आतापर्यंत एकूण 9 लाख 14 हजार रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सदर संशयितांना 6 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना 10 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तपास पथकाच्या उल्लेखनीय कामगिरी बददल पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी त्यांना रोख रूपये 10 हजार चे बक्षिस देवून त्यांचा गौरव केला आहे.