Nashik News : नाशिकच्या (Nashik) दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) निळवंडी गावचे जवान आदित्य जाधव  (Aditya Jadhav) जम्मू काश्मीरमध्ये निधन झाल्याची घटना घडली आहे. दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भागातून पुढे येत सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांच्या निधनानंतर माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह तालुक्यातील जनतेने श्रद्धांजली अर्पण केली.


दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील सैन्य दलातील जवान आदित्य अशोक जाधव यांचा निधन झाल्याची माहिती पोलीस पाटील व नातलगांना मिळाली असून जाधव यांचे पार्थिव उद्या उशिरापर्यंत निळवंडी गावात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. निळवंडी येथील आदित्य अशोक जाधव हा सैन्य दलात लडाख येथे कार्यरत होता या जवानाचे निधन झाल्याची माहिती शनिवारी रात्री संबंधित विभागाकडून दूरध्वनी द्वारे त्याच्या नातेवाईक व पोलीस पाटील यांना प्राप्त झाली . या घटनेमुळे निळवंडी मध्ये दिंडोरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. 


दरम्यान मागील महिन्यात 30 डिसेंबर रोजी सुट्टी संपून आदित्य जाधव लडाखला परतला होता. त्यानंतर नऊ दिवसांनी त्याच्या निधनाची वार्ता आल्याने कुटुंबीयांना धक्काच बसला आहे. दरम्यान जाधव यांचा मृत्यू कसा झाला? याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्यांची पार्थिव उद्या निळवंडी गावात येणार असून त्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 


छगन भुजबळ यांची श्रद्धांजली 
दिंडोरी तालुक्यातील निळवंडी गावचे सुपुत्र आदित्य जाधव यांना जम्मू काश्मीर येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना विरमरण आले. अतिशय दुःख झाले. दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भागातून पुढे येत आपले शिक्षण पूर्ण करत आदित्य जाधव यांनी खडतर परिस्थितीतून मेहनत घेऊन भारतीय सैन्यदलात सहभाग नोंदविला. जम्मू काश्मीरच्या सीमेवर भारत मातेच्या देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या निधनाने भारत मातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय शहीद आदित्य जाधव यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.


नाशिक जिल्ह्यावर शोककळा 
डिसेंबर महिन्यात नाशिकच्या निफाड तालुक्यातील उगाव येथील रहिवासी जनार्दन उत्तम ढोमसे यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले होते. त्यानंतर त्याच सुमारास सटाणा येथील भूमिपुत्र सारंग अहिरे हे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना निधन झाले होते. त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली असून दिंडोरी तालुक्यातील जवान आदित्य जाधव यांचे निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव उद्या नाशिकला येणार असल्याची माहिती आहे.