नाशिक: नाशिक शहरातील (Nashik News) हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेले श्री सिद्धीविनायक चांदीच्या गणपती मंदिरातील देवाच्या गळ्यातील दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघड झाली आहे. हा प्रकार उघड होताच भाविकांना मोठा धक्का बसला आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या चोरीनंतर आता मंदिराच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नाशिकमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ काही थांबायचं नाव घेत नाही. कधी घरफोडी तर कधी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढणे, तर कधी बेधडक दरोडे असे प्रकार सध्या वाढताना पाहायला मिळत आहेत. आता तर गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धीविनायक मंदिर या ठिकाणी गणपतीच्या गळ्यातील चोरट्यांनी देवाच्या गळ्यातील दागिने पळवले आहे.
बाप्पाच्या मूर्तीवरील 300 ग्रॅम सोन्याचे पॉलिश केलेले दागिने घेऊन पळ काढला
श्री सिद्धीविनायक चांदीच्या गणपती मंदिरात रविवारी पहाटे एका चोरट्यानी देवाच्या दागिन्यांची चोरी करुन पळ काढला. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एका चोराने लोखंडी रॉडने मंदिराच्या प्रवेशद्वाराची काच फोडत आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षारक्षकानं हा सगळा प्रकार बघितला आणि या दोघांमध्ये झटापट झाली. सुरक्षारक्षक गंगाधर हाके यांच्या डोक्यावर रॉडने मारहाण झाल्यानं ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर या चोराने बाप्पाच्या मूर्तीवरील 300 ग्रॅम सोन्याचे पॉलिश केलेले दागिने घेऊन पळ काढला.
सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. जेव्हा पेट्रोलिंग करत असणाऱ्या पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी या चोराचा पाठलाग केला. चोरट्याने गंगावाडी परिसरात थेट गोदावरी नदीत उडी मारून पळ काढण्याचा प्रयत्नही केला होता मात्र स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. निहाल यादव असे चोराचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे.
मंदिराच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या मंदिरात प्रवेश करून दागिने पळवण्यापर्यंत आता चोरट्यांचे धाडस पोहोचल्याने आता पोलीस प्रशासन नेमकं करतंय तरी काय असा प्रश्न भाविक विचारात आहेत. ही चोरीची घटना कळल्यानंतर पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. या चोरीनंतर आता मंदिराच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Nashik Crime : नाशिकमध्ये भरदिवसा पुन्हा गोळीबार, सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी गंभीर जखमी