नाशिक : सकल हिंदू समाजातर्फे (Sakal Hindu Samaj) पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान (Nashik Band) दुकाने बंद करण्यावरून दोन गटांत वाद झाला होता. यानंतर वादाचे रुपांतर दगडफेकीत झाले. यामुळे नाशिकमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता या प्रकरणी नाशिक पोलीस (Nashik Police) अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत 300 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून अनेकांची धरपकड सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण (Kirankumar Chavan) यांनी दिली आहे. 


बांग्लादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ एका समूहाने शुक्रवारी पुकारलेल्या नाशिक बंदला अचानक हिंसक वळण लागले. दोन वेगवेगळे गट आमनेसामने आले व त्यांनी दगड, विटा, काचेच्या बाटल्या एकमेकांवर फेकल्या. पोलिसांनी वेळीच धाव घेत, परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच  संशयितांची धरपकड करायला सुरुवात केली.  


300 जणांवर गुन्हे दाखल, अनेकांची धरपकड सुरू


आता नाशिकच्या प्रकरणात शहर पोलिसांनी मोठी कारवाई कारवाई केली आहे. आतापर्यंत 300 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 20 हून अधिक समाजकंटकांना अटक करण्यात आली असून 100 पेक्षा अधिक जणांची ओळख पटली आहे. शहरात सध्या अनेकांची धरपकड सुरू असून संवेदनशील भागात पोलिसांची नजर कायम असणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली आहे. दंगलखोरांच्या अटकेचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आणि दंगल भडकविण्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


...तर आपला जिल्हा मागे पडेल : छगन भुजबळ


नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या बंदला हिंसक वळण लागले. दोन गटात वाद होऊन दगडफेक करण्यात आली. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, आमची जबाबदारी शांतता राखण्याची आहे. जे झाले ते चुकीचे झाले आहे. मोर्चा शांततेत काढला पाहिजे, आक्रमकपणे नाही. बांगलादेशमध्ये हल्ले झाले, तिकडे पंतप्रधान मोदी लक्ष ठेवून आहे. कोणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये. सर्वांनी शांतता ठेवली पाहिजे, आपण शांत राहणे आवश्यक आहे. नाशिक व उर्वरित जिल्ह्यात शांतता ठेवा. कायदा व सुव्यवस्था कोणीही हातात घेवू नये. आपल्याकडे सध्या इंडस्ट्रियल, हॉस्पिटल, शाळांचा विकास सुरू आहे. शासन जागरूकपणे लक्ष ठेवून आहे. दंगलखोर जिल्हा म्हणून आपली ओळख झाली तर आपल्याकडे गुंतवणूक होणार नाही. आपला जिल्हा मागे पडेल. तरी सर्वांनी शांतता राखावी. दंगली सुरू झाल्या तर कोणीही आपल्याकडे येणार नाही. उद्योगधंदे वाढले आहे ते मागे जातील, असे त्यांनी म्हटले.


आणखी वाचा 


Nashik Crime : क्रुरतेचा कळस.. सात वर्षीय चिमुरडा बेपत्ता; तीन दिवसांनी झुडपात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?